शिवसेना-मनसे एकत्र येणे अशक्य?

January 30, 2013 11:04 AM0 commentsViews: 37

30 जानेवारी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत अशी अपेक्षा केली जात असली तरी ती पूर्ण होणे कठीण आहे. आजपर्यंतची ही 'आतली'चर्चा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. पण राज ठाकरे यांनी यावर 'नो कॉमेंट्स' असं उत्तर देत उद्धव यांच्या आवाहनाला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार नसल्याचं मनसेच्या विश्वसनिय सुत्रांनी आयबीएन लोकमतला माहिती दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी कामाला लागले. स्वत:कडे सर्वअधिकार घेऊन पक्षात शिवसेना पक्षप्रमुख असे पद निर्माण करून विराजमान झाले. त्यापाठोपाठ फेब्रुवारीत राज्याचा दौराही आखण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र 'दैनिक सामना'तून उद्धव ठाकरे यांची मॅरेथान मुलाखत प्रसिद्ध होतं आहे. आज बुधवारच्या अंकात मुलाखतीच्या दुसर्‍या भागात उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत पहिल्यांदाच स्पष्टपणे भूमिका मांडली. 'टाळी एका हाताने वाजत नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडे मागू शकत नाही. त्यासाठी आम्हा 'दोघांना' एकत्र आणून समोरासमोर बसवा, बाजूबाजूला बसवा आणि मग हा प्रश्न विचारा. या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून आहे. कारण मी काहीही उत्तर दिलं आणि त्याच्या मनात नसेल तर ? पण कोणी मनापासून शिवसेनेसोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच करू असं सांगत उद्धव यांनी युतीचा हात पुढे केला.

पण राज ठाकरेंनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे राज शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत फारसे उत्सुक नाही अशीच चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे. तसंच भविष्यात शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता नसल्याचंही मनसेच्या सूत्रांनी आयबीएन-लोकमतला सांगितलंय.

या अगोदरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभांमधून राज ठाकरे शिवसेना सोडून गेले याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान बाळासाहेबांनी याच मुद्यावर आपल्या जुन्या आठवणी सभेत बोलून दाखवल्या होत्या. त्यावर मी आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे. बाळासाहेबांसाठी शंभर पावलं चालण्याची तयारी आहे पण उद्धवसाठी एक पाऊल सुद्धा टाकणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. राज ठाकरे शिवसेनेतून गेले याचे सर्वात जास्त दुख बाळासाहेबांना होते. याबद्दल शिवसेनेच्या जेष्ठनेत्यांनी दुजोरा दिला होता.

एवढेच नाही तर दसर्‍या मेळाव्यानिमित्तच्या त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांनी आपली खंत बोलूनही दाखवली होती. आज मी 86 वर्षांचा आहे गेली 45 वर्ष शिवसेना सांभाळली उभारली. हे दादर सांभाळलं. पण आज ह्याच दादरचे दोन तुकडे झाले. ज्या दादरमध्ये मी शिवसेनेचं भवन उभं केलं. त्या दादरमध्ये शिवसेनेचे दोन तुकडे पाडले गेले. ते करायला नको होतं. एकत्र या आणि काँग्रेसच्या धूळ चारा असं आवाहन बाळासाहेबांनी राज यांचं नाव न घेता केलं होतं. 2014 च्या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्ष मैदानात उतरण्यासाठी तयारीला लागले आहे. दोघांचेही मार्ग वेगळे जरी असले तरी ध्येय एकच आहे त्यामुळे मराठी माणसांची अपेक्षा पुन्हा एकदा अपूर्ण राहीली असंच म्हणावं लागेल.

close