दिल्ली गँगरेप प्रकरणाला 1 महिना पूर्ण; परिस्थिती जैसे थेच

January 16, 2013 4:48 PM0 commentsViews: 30

मीनाक्षी उपरेती,दिल्ली

16 जानेवारी

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज एक महिना पूर्ण झाला. बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. केंद्र आणि दिल्ली सरकारनं महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजनांची घोषणा केली होती. पण परिस्थितीत फारसा फरक पडला नसल्याचं दिसतंय. दिल्लीतल्या महिलांमध्ये अजूनही तितकीच असुरक्षिततेची भावना आहे. त्यासाठीच आज विद्यार्थ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं. आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे, अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. दुसरीकडे या बलात्कार प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू आहे.

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला. या प्रकरणामुळे देशभरात उठलेल्या संतापाच्या लाटेनंतर केंद्र सरकारनं अनेक उपाययोजनांची घोषणा केली होती. पण गेल्या महिन्याभरात काहीच बदल झालेला नाहीय. खरी स्थिती अशी आहे की, आजही दिल्लीत महिलांना एकटीनं प्रवास करणं तितकंच असुरक्षित आहे. रात्री धावणार्‍या बसेसमध्ये होमगार्ड ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्याची अंमलबजावणी तर झालीय. पण या होमगार्डच्या हातात साधी काठीसुद्धा नाही.

काही भागात बॅरिकेड्स आणि पोलिसांची गस्त वाढवण्यात आलीय. पण तरीही आपल्याला सुरक्षित वाटत नाही, अशी महिलांची भावना आहे.

संध्याकाळी सात वाजल्यानंतर दिल्लीतले रिक्षावाले भाडं स्वीकारायला नकार देतात. महिलांसाठी सुरू केलेली हेल्पलाईन सुरळीत नाहीय. दिलेल्या नंबरवर फोन केल्यानंतर तक्रारदाराचा कॉल एका नंबरवरून अनेक नंबरवर ट्रान्सफर केला जातो. महिन्याभरापूर्वी सामूहिक बलात्कार प्रकरणात बहादूर मुलीचा बळी जाऊनही दिल्लीतल्या महिला अजून असुरक्षित असतील तर यावर सरकार आणि प्रशासनानं गंभीर विचार करण्याची गरज आहे.

close