भारताची विजयी सलामी

February 26, 2013 1:52 PM0 commentsViews: 12

26 फेब्रुवारी

चेन्नई टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने मात करत भारताने दमदार विजयाची नोंद केली आहे.या विजयाबरोबरच चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाची टीम दुसर्‍या इनिंगमध्ये 241 रन्सवर ऑलआऊट झाली आणि भारतासमोर विजयासाठी 50 रन्सचं आव्हान ठेवलं. पहिल्या इनिंगमध्ये सात विकेट घेणार्‍या आर अश्विननं दुसर्‍या इनिंगमध्येही 5 विकेट घेतल्या. विजयाचे हे माफक आव्हान भारतानं 2 विकेटच्या मोबदलत्यात पार केलं. ओपनिंगला आलेले मुरली विजय आणि सेहवाग झटपट आऊट झाले. पण यानंतर आलेल्या सचिन तेंडुलकरने दोन खणखणीत सिक्स ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं. डबल सेंच्युरी करणारा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

कॅप्टन महेंद्रसिंग धोणीसाठी हा सर्वात अविस्मरणीय विजय…खराब फॉर्ममधून जाणार्‍या टीमसाठी आणि स्वता कॅप्टनसाठी हा विजय महत्वाचा ठरला. धोणीची आक्रमक खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवली जाईल. धोणीनं आपल्या टेस्ट क्रिकेट कारकीर्दीतली पहिली डबल सेंच्युरी तर झळकावलीच पण भारतीय टीमला एक भक्कम आघाडी मिळवून दिली. आणि भारताच्या विजायासाठी हीच खेळी निर्णायक ठरली.

पण धोणी एकटाच या विजयाचा शिल्पकार नव्हता. युवा बॅट्समन विराट कोहलीची शानदार सेंच्युरी, सचिन तेंडुलकरनं पहिल्या इनिंगमध्ये केलेले 81 रन्स आणि दुसर्‍या इनिंगमध्ये ठोकलेले दोन खणखणीत सिक्स, भारतीय बॅटिंगची वैशिष्ट्य ठरली. रविंद्र जडेजानंही आपली निवड योग्य ठरवत टेस्टमध्ये पाच विकेट घेतल्या. पण खरी कमाल केली ती आर अश्विननं..टेस्ट कारकिर्दीतल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद अश्विननं केली. या मॅचमध्ये त्याने तब्बल 12 विकेट घेतल्या.

चेन्नई टेस्टमधल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर मात्र प्रश्न उभा राहिला. फास्ट बॉलर जेम्स पॅटिन्सन वगळता एकाही ऑस्ट्रेलियन बॉलरला आपली छाप उमटवता आली नाही. तर बॅटिंगमध्ये कॅप्टन क्लार्क आणि टेस्ट पदार्पण करणारा मोझेस हेन्रिक्स भारतीय स्पीनला सामोरं जाण्यात यशस्वी ठरले.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची दुसरी टेस्ट आता येत्या शनिवारी हैदराबादमध्ये रंगणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पहिल्या विजयानंतरही भारताला सीरिज गमवावी लागली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आता भारतीय टीमला घ्यावी लागणार आहे.

close