एनएचएआय बीओटी तत्वावर 70 हजार कोटींची गुंतवणूक आणणार

December 5, 2008 10:57 AM0 commentsViews: 8

5 डिसेंबर, नवी दिल्लीव्हिवियन फर्नांडिसअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया 70 हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक आणणार आहे. नवीन प्रकल्पाद्वारे ही गुंतवणूक आणण्यात येईल. नॅशनल हायवे डेव्हल्पमेंटच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यामध्ये सरकारची गुंतवणूक होती. मात्र तिसरा टप्पा हा ' बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा ' ( बीओटी ) या तत्वावर खासगी गुंतवणुकीतून बांधण्यात येत आहे. यामुळे खासगी गुंतवणूक येईल आणि त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी होईल. ' जवळपास प्रत्येक प्रकल्प हा त्याच्या वेळेच्या आणि खर्चाच्या मर्यादांच्या पलीकडे गेलेला आहे आणि याचा फटका सगळ्यांनाच बसतोय ', असं राज्यसभा सदस्य एन. के. सिंग यांनी सांगितलं. नॅशनल हायवे बांधण्यासाठी अथॉरिटीनं फेब्रुवारी महिन्यात अर्ज मागवले होते. त्यानंतर असे अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे आणि बोली लावणार्‍या कंपन्यांची संख्या किती असावी, यावरून वाद सुरू झाले. आता हे वाद मिटवण्यात आले असून मार्च अखेरपर्यंत 70 हजार कोटी रुपयांचे 60 कॉन्ट्रॅक्टस 3 टप्प्यांमध्ये देण्यात येतील. ' यापैकी 43 प्रोजेक्ट्स आधी मार्गी लागतील. एका लॉटमध्ये 21 आणि दुसर्‍यात 22 . बोली साठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात आणि येत्या दोन महिन्यांत हे प्रोजेक्टस देण्यात येतील. उरलेले 17 प्रोजेक्ट तीन टप्प्यात येतील. चालू आर्थिक वर्षात एकूण 60 प्रोजेक्टचं काम देण्यात येईल ', असं एनएचएआय सदस्य दीदार सिंग यांनी स्पष्ट केलं.सध्या बँका जोखीम घेण्याच्या पवित्र्यात नसल्याने एनएचएआयनं सरकारला इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीद्वारे 50 हजार कोटी रुपयांची मदत मागितलीय. ही रक्कम वर्ल्ड बँकेकडून कर्ज म्हणून घेण्यात येईल. सरकारने ठरवलेल्या प्रोजेक्ट कॉस्टवरून बँकांच्या कर्जाचं प्रमाण ठरतं. पण गेल्या दोन वर्षांत स्टील, सिमेंट, तेलाच्या किंमती वाढल्यायत. हायवे प्रोजेक्टचा नफा वाढावा, म्हणून सरकार 40 टक्के ग्रॅण्ट देतं. पण प्रोजेक्ट कॉस्ट वाढल्याने सरकारला ही मर्यादाही बदलावी लागेल.

close