रक्तरंजित राजकारणाचा थरार (समीक्षा)

March 9, 2013 11:55 AM0 commentsViews: 29

अमोल परचुरे,समीक्षक

08 मार्च

2010 साली आलेल्या 'साहेब बीवी और गँगस्टर ' या सिनेमाचा खर्‍या अर्थाने सिक्वेल असलेला सिनेमा. पहिल्या सिनेमातील संदर्भ आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मूळ सिनेमा पाहिला नसला तरीही हा सिक्वेल तुम्हाला कळू शकेल, तुम्ही चांगलाच एंजॉय करु शकाल. कथा-पटकथा स्वत: दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया चीच आहे आणि ही कथा एकदम ओरिजिनल आणि फ्रेश आहे. उत्तर भारतातील रक्तरंजित राजकारणाचं अगदी अचूक प्रतिबिंब यामध्ये आहे. पटकथा एवढी बंदिस्त आहे की, कोणतंही कॅरेक्टर किंवा कोणताही प्रसंग यामध्ये अनावश्यक वाटत नाही. प्रत्येक कॅरेक्टरचा नीट अभ्यास करुन हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे हे अगदी पहिल्या फ्रेमपासून जाणवत राहतं.

आदित्य प्रताप सिंग म्हणजे साहेब(जिमी शेरगिल ) आणि माधवी म्हणजे बीवी (माही गिल ) या आहेत प्रमुख व्यक्तिरेखा ज्या पहिल्या सिनेमातही होत्या. पहिल्या सिनेमातल्या गँगस्टरला माधवी ठार करते आणि या गोळीबारात साहेबही कमरेखाली पांगळा होतो. माधवी मग निवडणूक लढवते आणि ती आमदारही बनते. यानंतर आता पुढचा भाग म्हणजे हा नवा सिनेमा. साहेब आणि बीवी यांच्यातले संबंध आता आणखीनच बिघडले आहेत. दोघांचा एकमेकांशी संवादच नाही. माधवी दारुच्या नशेत गुरफटलीये, पण तरीही तिला साहेबला धडा शिकवायचाय.

दरम्यान, साहेबची सावत्र आई साहेबचं दुसरं लग्न रंजना अर्थात सोहा अली खान सोबत ठरवते पण रंजनाचे वडील म्हणजे राज बब्बर यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही म्हणून साहेब बिथरतो. दरम्यान, रंजनाचा प्रियकर इंदरजित हा आता नावापुरता प्रिन्स राहिलेला आहे. इंदरजितच्या पूर्वजांचं ऐश्वर्य साहेबच्या पूर्वजांमुळेच संपुष्टात आलेलं असतं. त्यामुळे त्याला साहेबवर सूड उगवायचाच असतो. असा हा सगळा सूडाचा प्रवास आहे. या सगळ्या सत्ताकारणाला पार्श्वभूमी आहे ती उत्तर प्रदेश राज्याच्या विभाजनाची… वैयक्तिक पातळीवरचं सूडनाट्य ते सत्ता हातात ठेवण्यासाठीची धडपड अशाप्रकारे पटकथा गुंफण्यात आलेली आहे.

तिग्मांशूने प्रत्येक कॅरेक्टरवर विशेष मेहनत घेतलीये. प्रमुख चार कॅरेटर्स तर आहेतच, पण त्याशिवाय इतर छोटी छोटी कॅरेक्टर्ससुध्दा अगदी खरी वाटावीत अशीच आहेत. यातले पोलीस फिल्मी वाटत नाहीत, राजकारणी टिपिकल सिनेमातले वाटत नाहीत. वरकरणी महिलांच्या कल्याणाची भाषा करणारे आणि प्रत्यक्षात ऑफिसमध्ये बसून अश्लील सिनेमे बघणारे राजकारणी बघून गंमतही वाटते आणि रागही तेवढाच येतो. सिनेमातले डायलॉग्जसुध्दा एकदम सूचक आणि परिणामकारक झालेत. एकंदरीत आशयामध्ये हा सिनेमा एकदमच वरच्या दर्जाचा झालाय. यातली हिंसा अंगावर येत नाही, यात भडक सेक्स नाही, मेलोड्रामा नाही, राजकारणातले डावपेचही एकदम विचारपूर्वक, अतिशय प्रभावीपणे या सिनेमाची मांडणी तिग्मांशू धुलियाने केलेली आहे.

सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन जसं दर्जेदार आहे तसाच उत्तम दर्जा आहे अभिनयाचा…व्हिलचेअरवर बसावं लागत असल्यामुळे आलेली हतबलता पण त्याचवेळी आपण साहेब किंवा राजा असल्याचा उन्माद जिमी शेरगिलने अचूक दाखवलाय. पहिल्या सिनेमामध्ये रंगेल गडी असलेला हा साहेब आता थोडा गंभीर झालाय आणि हा बदल जिमीने सुंदरच दाखवलाय. माही गिलने या सिनेमातही कमाल केलीये. तिला खरंच दारुच्या आहारी गेलीये अशाप्रकारे प्रमोशन करण्यात आलं असलं तरी पडद्यावर तरी तिने व्यसनाधीन तरीही सजग असलेली, सत्ताकारणात मोठी मजल मारायचं स्वप्न बघणारी, पुरुषप्रेमासाठी झुरणारी अशी सगळी रुपं तिने दाखवली आहेत.

सोहा अली खानने 'रंग दे बसंती' नंतर चांगला अभिनय केलाय असं म्हणता येईल, पण खरी कमाल केलीये अर्थातच इरफान खान ने. दिग्दर्शक आणि अभिनेता यांची केमिस्ट्री उत्तम असेल तर काय धमाल येते ते अनुभवा या सिनेमात… इरफान आणि तिग्मांशु यांनी याआधी 'पानसिंग तोमर' हा सिनेमा एकत्र केला. अगदी तसाच तडाखेबाज अभिनय इरफानने केलाय आणि सिनेमाची रंगत आणखी वाढवलेली आहे. अर्थात सगळ्या गोष्टी उत्तम जमून आल्या असल्या तरी मुग्धा गोडसेचं आयटम साँग टाळता आलं असतं, पण एवढी एक त्रुटी सोडली तर सिनेमा आपल्याला चांगलाच गुंतवून ठेवतो. 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स'ला रेटिंग -70

close