आरोपाच्या आखाड्यात सोमय्या-भुजबळ पुन्हा आमने-सामने

February 1, 2013 12:40 PM0 commentsViews: 35

01 फेब्रुवारी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांचे आर्थिक व्यवहार ज्या अनिल बस्तावडे यांनी सांभाळले होते. त्याने याच व्यवहारातून दुबईत मोठी गुंतवणूक केल्याची माहितीही अंमलबजावणी संचालनायला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर अनिल बस्तवडे याला अटक करण्यात आली आहे. या अनिल बस्तावडेबरोबर समीर भुजबळ यांच्या जकार्तामध्ये बैठका झाल्या. या बैठकांद्वारे भुजबळ यांच्या कंपनीला काही खाणी इंडोनेशियामध्ये मिळत आहे. या प्रकरणी भुजबळांनी या आरोपांचा खुलासा करावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

तर किरीट सोमय्यांचे आरोप तद्दन खोटे आणि बिनबुडाचे आहेत असं म्हणत छगन भुजबळांनी हे आरोप फेटाळले आहेत. बस्तावडेचा आमच्याशी काही संबंध नाही असं भुजबळांनी सांगितलं. सोमय्या यांनी दिल्लीपासून ते सगळ्या यंत्रणेकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची चौकशीही सुरू आहे. पण किरीट यांना त्यात रस नाही त्यांना फक्त छगन भुजबळ यांची प्रतिमा मलिन करण्यात रस आहे असा टोलाही भुजबळांनी लावला. किरीट यांचे आरोप तोडपाण्यासाठी आहेत असा आरोपही भुजबळांनी सोमय्यांवर केला. सोमय्यांनी आतापर्यंत डझनभर पत्रकार परिषदा घेतल्यात त्यातले कोणतेही आरोप अजून सिद्ध झाले नाहीत असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

close