‘ना मटरू ना बिजली’ नुसता गोंधळात गोंधळ(समीक्षा)

January 12, 2013 12:00 PM0 commentsViews: 17

अमोल परचुरे, समिक्षक

12 जानेवारी

ही कथा आहे मंडोला गावाची आणि त्या गावावर राज्य करणार्‍या मंडोलाची… या गावात सेझ(SEZ) आणण्याचं या मंडोलाचं स्वप्न आहे, मंडोलाच्या भूमिकेत आहे पंकज कपूर. ऊर्जामंत्री असलेल्या शबाना आझमीची त्याला पूर्ण साथ आहे, पण या सेझला गावकर्‍यांचा विरोध असतो. आपल्या कसदार जमिनी द्यायला ते तयार नाहीत. एक अज्ञात नेता माओ त्यांना आंदोलन उभारायला मदत करतोय. दुसरीकडे, मंडोलाची मुलगी बिजली आणि शबाना आझमीचा मुलगा बादल यांच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. शबाना आझमीचा डोळा मंडोलाच्या प्रचंड मालमत्तेवर असतो. या सगळ्या गोंधळात मंडोलाचं दारुचं व्यसन सुटणं खूप महत्त्वाचं असतं. कारण दारू प्यायलावर मंडोला काहीही करु शकतो, आपल्याच विरोधात शेतकर्‍यांना चिथावू शकतो, हेलिकॉप्टर उडवू शकतो…दारूच्या नशेत एक वेगळाच मंडोला कोणतेही निर्णय घेऊ शकतो म्हणूनच ड्रायव्हिंगबरोबरच मंडोलाला दारुपासून दूर ठेवणं हे काम आहे मटरुचं म्हणजेच इमरान खानचं…एकंदरित, सिनेमात खूप गोंधळ आहे.

गेल्या काही वर्षांपासून पूर्ण देशभरात शेतकर्‍याच्या जमिनींचा प्रश्न ज्वलंत बनलेला आहे. या समस्येवर विशाल भारद्वाजला खूप काही सांगायचंय, अगदी तळमळीनं सांगायचंय. सरकारी अधिकारी, राजकारणी, उद्योगपती यांचं कसं साटंलोटं असतं, शेतकरी त्यामुळे कसा नाडला जातो हे सगळं सांगायचा विशाल भारद्वाजचा प्रयत्न आहे, पण त्याबरेाबर जो बाकीचा सिनेमातला भाग आहे तो काही ठिकाणी एवढा निरर्थक आहे की त्यामुळेच सिनेमातला सगळा इंटरेस्ट संपून जातो. बरं, जे काही घडतं त्याची संगती लावताना प्रेक्षकांचाही गोंधळ होतो. दारुचं सेवन केलं नाही तर पंकज कपूरला दिसणारी काल्पनिक गुलाबी म्हैस, माओच्या युक्त्या, शबाना आझमीचा मुलगा बादल म्हणजेच आर्य बब्बरचा शेती कायमची नष्ट करण्याचा फसलेला प्रयत्न, दारू पिऊन पंकज कपूरचा गोंधळ, दक्षिण आफ्रिकेतून आलेले स्थानिक कलाकार असं खूप काय काय घडत असतं आणि आता संपवा एकदाचं सगळं असंच प्रेक्षकाचं होऊन जातं.

विशाल भारद्वाजचे फॅन्स ज्या सिनेमाची वाट बघत होते तो 'मटरू की बिजली का मंडोला' हा सिनेमा या आठवड्यात रिलीज झालाय. पण विशाल भारद्वाजने आपल्या फॅन्सना प्रचंड निराश केलेलं आहे. विशाल भारद्वाजच्या सिनेमात असतात त्या सगळ्या गोष्टी या सिनेमात आहेत. गुलजार यांनी लिहीलेली गाणी आहेत, रेखा भारद्वाजचं संगीत आहे, पंकज कपूर आणि शबाना आझमी यांचा जबरदस्त अभिनय आहे. पण मिसिंग आहे तो म्हणजे दिग्दर्शक विशाल भारद्वाज…आपल्याला नेमकं काय सांगायचंय हेच दिग्दर्शकाला ठरवता आलेलं नाहीये, सिनेमा कॉमेडी करायचा की समस्याप्रधान करायचा यात प्रचंड गोंधळ झालाय. त्यात भर पडलीये ती इमरान खानच्या कमजोर अभिनयाची…पंकज कपूर एकटा कुठेकुठे पुरा पडणार ना…एक फसलेला सिनेमा असंच या सिनेमाबद्दल सांगावं लागेल.

अभिनयाचं म्हटलं तर सर्वात जबरदस्त कामगिरी केलीये ती पंकज कपूरनं, मैदान गाजवणं म्हणतात तसं पंकज कपूरने मोठा पडदा गाजवून टाकलाय. बोलण्याचा हरियाणवी ढंग, दारु पिण्यापूर्वी करारी मंडोला आणि दारु प्यायलानंतर गोंधळ घालणारा विनोदी मंडोला अशी दोन्ही रुपं साकारताना पंकज कपूर यांनी कमाल केलेली आहे. शबाना आझमींनी सुध्दा तुलनेने छोट्या भूमिकेत सिनियर असणं म्हणजे काय ते दाखवून दिलंय. अर्थात, या सिनियर मंडळीचा कोणताही प्रभाव इमरान खानवर पडलेला नाहीये. इमरान खानने खूपच निराशा केलेली आहे. खरंच, जर इमरानऐवजी दुसरा समर्थ अभिनेता असता तर सिनेमा थोडा चांगला बनला असता, बाकी, अनुष्का नेहमीप्रमाणेच चुलबुली दिसलेय आणि तिने इमरानपेक्षा चांगलाच अभिनय केलाय. बाकी संगीतकार विशाल भारद्वाजही फारसा प्रभावी ठरला नाहीये. 'ओय बॉय चार्ली' आणि टायटल साँगशिवाय बाकी गाणी लक्षात राहणार नाहीत. एकंदरित, जर तुम्ही पंकज कपूरचे खूप खूप फॅन असाल तर आणि तरच हा सिनेमा बघा नाहीतर हा सिनेमा टाळायला हरकत नाही.

close