झारखंड खाण घोटाळा प्रकरणी अनिल बस्तवडेला अटक

January 30, 2013 2:31 PM0 commentsViews: 14

30 जानेवारी

झारखंडमधील सुमारे चार हजार कोटींच्या खाण घोटाळा प्रकरणी अनिल बस्तवडे याला मंगळवारी इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे अटक करण्यात आली. खाण घोटाळ्याचे सुत्रधार झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचे आर्थिक व्यवहार अनिल बस्तवडे हा सांभाळत होता. त्याने याच व्यवहारातून दुबईत मोठी गुंतवणूक केल्याची माहितीही अंमलबजावणी संचालनायला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर अनिल बस्तवडे याला अटक करण्यात आली आहे.

अनिल बस्तवडेच्या अटकेनंतर सांगलीत आज चांगलीच खळबळ उडाली. बस्तवडे याचे मूळ गाव सांगली नजीकचे भोसे हे असून त्याचा सांगलीत विश्रामबाग परिसरातील सावरकर कॉलनीत बस्तवडे यांचा बंगला आहे. त्याशिवाय पुणे येथे एक फ्लॅट असल्याची माहितीही पुढे आली आहे. झारखंडमध्ये चार हजार कोटींचा खाण घोटाळा उघडकीस आला आहे. कोडा या प्रकरणाचा तपास सुरू असताना अंमलबजावणी संचालनालयाला अनिल बस्तवडे याचे नाव कळले. कोडा यांच्या गैरव्यवहारातील तो प्रमुख साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. इतकंच नव्हे तर कोडा याला अटक झाल्यानंतर त्यांचे बेकायदा व्यवहार सांभाळण्याचं काम बस्तवडे याने केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बस्तवडे याचा तपास सुरू झाला. तो विदेशात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर इंटरपोलला त्याबाबत कळविण्यात आले. त्यांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यानंतर तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला. तो जाकार्ता येथे असल्याची माहिती मिळताच त्याला इंटरपोलने ताब्यात घेतले. त्याला रात्री उशिरा नवी दिल्लीत आणण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

close