‘नौटंकी करणार्‍यांना जशास तसे उत्तर देऊ’

February 27, 2013 1:34 PM0 commentsViews: 23

27 फेब्रुवारी

कुणी काही नौटंकी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देऊ. आम्ही विकास केलाय, त्याबळावर निवडून येतो. जर कोणी गुंडगिरी आणि दादागिरी केली तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा सणसणीत इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. गुजरात आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं कौतूक तुम्ही सुरू केलंय आणि वरून परप्रांतियांनी इथं येऊ नका म्हणता. हे काय चाललंय असा सवालही अजित पवार यांनी केला. हा गडी बावचळलाय असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

मनसे विरूद्ध राष्ट्रवादी वाक्ययुद्ध आता शिगेला पोहचले आहे. एकमेकांवर टीकाकरणारे दोन्ही नेते आता हामरीतुमरीवर आले आहे. अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज राज्यभरात उमटले. नगरमध्ये झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय करणार होते हे पोलिसांना माहित होते. पण पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी कारवाई का केली नाही? का बघ्याची भूमिका घेतली असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज यांच्या या प्रश्नाला अजित पवारांनी सनसणीत उत्तर दिलंय. इतर पक्षामध्ये 'हम करे सौ कायदा' असं असतं. तिथे काम करण्यासाठी बंधन असतात पण राष्ट्रवादीत काम करण्यासाठी मुभा आहे, मोकळीक आहे. इथं नात्यागोत्याच राजकारण चालत नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी नंबर 1 चा पक्ष आहे.

मात्र मुंबईतील काही जणांचे मस्त राजकारण चाललंय एकीकडे मराठीचा मुद्दा म्हणून भांडायचं आणि दुसरीकडे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायचं. अलीकडेच त्यांनी चक्क बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. हा इतका पुळका कशाला ? इतक्या प्रकारचं वेगळं राजकारण चाललंय की, नेमकं काय करायचं याबद्दल हा गडी बावचाळून गेला,गोंधळून गेलाय हे त्याचं त्याला कळत नाही अशी खिल्ली अजित पवारांनी राज ठाकरेंची उडवली आहे.

तसंच हा देश राज्यघटनेवर चालतो. राज्यघटनेनं सर्वांना देशात कुठेही राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. पण त्यासोबतच आपआपल्या राज्यात मराठी माणसावर अन्याय होऊ नये यासाठी राष्ट्रवादी पक्ष निश्चित काम करत आहे असंही पवार म्हणाले. तसंच कुणी काही नौटंकी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देऊ. आम्ही विकास केलाय, त्याबळावर निवडून येतो. जर कोणी गुंडगिरी आणि दादागिरी केली तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा सणसणीत इशारा अजित पवारांनी दिला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते चवताळून मनसेवर टीकावर करत आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या दगडफेक हे राष्ट्रवादीचे कृत्य नाही. मनसे ही नवनिर्माण सेना नसून गुंड निर्माण सेना झाली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी केली आहे. तर या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल आणि त्यांना हातात दगड घ्यावे. त्यांना जर एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावे मग बघा त्यांचे महाराष्ट्रात काय हाल होतात असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

(बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला )

संबंधित बातम्या

==============================================

'दगडफेक पूर्वनियोजित होती' मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक उद्धव ठाकरेंनी घेतली राजची बाजू जशाच तसे उत्तर देऊ -राम कदम मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले

============================================

close