बेळगाव महापालिकेवर पुन्हा मराठीचा झेंडा

March 11, 2013 9:16 AM0 commentsViews: 44

11 मार्च

बेळगाव महापालिका पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीने काबीज केली. आज झालेल्या मतमोजणीत एकूण 58 पैकी 33 जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावचा महापौर पुन्हा एकदा मराठी महापौरच होणार आहे. मात्र मराठी मतांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपच्या खेळीमुळे एकीकरण समितीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

…बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकलाय. कर्नाटक सरकारने बरखास्त केलेली बेळगाव महापालिका, राष्ट्रपतींच्या हस्ते विधान सौंधचं उद्घाटन, बेळगावचं बेळगावी नामकरण या सर्व प्रकरणांमुळे मराठी भाषिकांत कर्नाटक सरकारविरोधात तीव्र संताप होता. निवडणुकीच्या निकालात त्याचे पडसाद दिसून आले.

महापालिकेत पुन्हा एकदा मराठी सत्ता आली खरी..पण माजी महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर या दोन माजी नगरसेविकांना मात्र पराभूत व्हावं लागलंय. चार वेळा महापौर झालेले संभाजी पाटील पुन्हा एकदा या निवडणुकीत विजयी झाले आहेत. येत्या एप्रिलमध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे. आणि बेळगावसह शहरी भागातील स्थानिक स्वराज संस्थासाठी होणार्‍या निवडणुका या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीमच असल्याचं मानलं जातंय. बेळगाव महापालिकेच्या निकालामुळे कर्नाटक विधानसभेत आता मराठी उमेदवार निवडून यायला मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

close