भंडारा बलात्कार,हत्येप्रकरणी आरोपींची माहिती देणार्‍यास 1 लाखाचे बक्षीस

March 2, 2013 10:26 AM0 commentsViews: 39

02 मार्च

भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडीतल्या तीन बहिणींची हत्या होऊन आज 15 दिवस उलटून गेले आहे. पण अजूनही आरोपी मोकाटच आहेत. तपासासाठी पोलिसांनी विविध पथकं स्थापन केली आहेत. पण तपासात अजूनही यश हाती आले नाही. संसदेतही या विषयावर झालेल्या चर्चेत पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आरोपींची माहिती देणार्‍यांसाठी पोलिसांनी आता 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच लाखनी आणि परिसरात सूचना पेट्या लावण्यात आल्या आहेत. याबाबत नागरिकांना काही माहिती द्यायची असेल किंवा तक्रार करायची असेल तर त्यांनी या पेटीत माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांचं आणि अधिकर्‍यांचं मुरमाडीला भेट देण्याचं सत्र सुरूच आहे. शुक्रवारी खासदार भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी खासदार मुणगेकर यांनी केली आहे. तर आरोपींना लवकरच अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

close