दलित दाम्पत्याला मारहाण प्रकरणाची क्राईम ब्रांच करणार चौकशी

January 29, 2013 10:05 AM0 commentsViews: 25

29 जानेवारी

सातारा दलित दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी क्राईम ब्रांच चौकशी करणार आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी त्याबाबतची घोषणा केलीय. स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेतला जाणार आहे. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात काही राजकीय दबाव असेल तर त्याचीही चौकशी करणार असल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलंय. माण तालुक्यात एका दलित जोडप्याला अत्यंत क्रूर पद्धतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यानंतर त्याची दखल घेत गृहमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय.

सातार्‍यात माण तालुक्यात एका दलित जोडप्याला अत्यंत क्रूर पद्धतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वैभव घाडगे असं या तरुणाचं नावं आहे. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी आपल्या पत्नीसह गावी गेला असताना गावातील सवर्णांनी त्या दोघांवर हल्ला केला. दोन तरुणांनी वैभव घाडगे आणि त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा लुटलं. तिचा विनयभंग केला आणि दरीत ढकलून त्यांच्यावर दगडांचा मारा केला. वैभव घाडगे यांच्या डोक्याला जबर मार लागलाय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चोरी आणि विनयभंगाचे गुन्हे दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहे. या घटनेतले जे आरोपी आहेत त्यांनी पाच वर्षांपूर्वी वैभवच्या काकांचा खून केल्याचा आरोप आहे. जामिनावर सुटले असताना त्यांनी वैभववर नियोजित हल्ला केल्याचा आरोप आहे. काकाच्या खून प्रकरणात मी फिर्यादी होतो, त्यामुळेच आरोपी नवनाथ कापसे यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप वैभव घाडगेंनी केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. वैभवच्या काकांनी शासकीय अनुदानातून स्वत:च्या जमिनीत विहीर खोदण्याचा निर्णय घेतला होता. दलितांने स्वत:च्या शेतीत विहीर खोदण्याचा हा निर्णय गावात अमान्य होता. त्या वादातून 5 वर्षांपूर्वी त्याचा खून झाला होता.

घटनाक्रम

- 22 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वा. बाईकने वैभव घाडगे पत्नीसह सीतामाई डोंगर घाटातून येत होता- घाटात दबा धरुन बसलेल्या तिघांनी घाटातील उतारावर त्यांना थांबवले- त्या तिघांनी मोटरसायकलची किल्ली काढून घेतली- दोघांच्याही अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन जबरदस्तीनं काढून घेतले- यातील दोघांनी वैभवला बेदम मारहाण केली- मारहाण थांबवणार्‍या वैभवची पत्नी मोहिनीला त्यांनी बाजूला ढकललं- मोहिनीनं आरडाओरडा सुरु केल्यानं त्या दोघांनाही त्यांनी दरीत फेकलं- झुडपात अडकलेल्या या दोघांवर त्यांनी दगडफेक केली- वैभवच्या डोक्याला जबर दुखापत झाली- मारेकरी पळून गेल्यानंतर मोहिनीनं लोकांना बोलावून बेशुद्ध वैभवला बाहेर काढलं- सातार्‍यातल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं- 23 जानेवारीला सायंकाळी पोलिसात फिर्याद दाखल-26 जानेवारीला पोलिसांनी एकाला अटक केली-अजूनपर्यंत इतर दोघांना अटक नाही-अजूनपर्यंत प्रत्यक्षदर्शी मोहिनीचा जबाब नोंदवला नाही

close