गरवारे मैदानावर बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रदालनाचा प्रस्ताव

February 19, 2013 9:28 AM0 commentsViews: 35

19 फेब्रुवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील स्मारकाचा वाद शमतोय तोच पुण्यात गरवारे बालभवनाच्या खेळाच्या मैदानावरील कलादालनाचा वाद निर्माण झाला आहे. गेली 27 वर्ष मुलांसाठी उत्तम काम करत असलेल्या बालभवनाच्या 20 गुंठे जागेवर शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचं दालन उभं करण्याचा महापालिकेतील सेना गटनेत्यांचा मानस आहे. त्याला बालभवन ट्रस्ट तसेच बालक आणि पालक यांचा तीव्र विरोध आहे. 2009 रोजी बालभवनचा आणि महापालिकेचा करार संपला असून तो पुन्हा वाढवण्याचा बालभवनचा प्रस्ताव 2 वर्ष धूळखात पडला. तर ज्या 20 गुंठे जागेवर कलादालन प्रस्तावित आहे त्या मोकळ्या मैदानाच्या आता कमर्शियल डेव्हलपमेंट असा नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव आहे. यानंतर बजेटमध्ये तरतूद करुन आणि वर्गीकरण करून मुख्य सभेमध्ये मंजुरीकरता प्रस्ताव सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या भूमी-जिंदगी विभागाच्या उपायुक्तांनीही याला दुजोरा दिला आहे.

पुणे महापालिकेने 1979 साली आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्ताने 2 एकर जागा मुलांच्या विकासासाठी राखून ठेवायचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वच संस्थांनी याचं अनुकरण करत बालभवनांची उभारणी केली. फक्त पुण्यात 200 च्या आसपास बालभवनं सुरू झाली. बालभवन ही केवळ संस्था न उरता चळवळ बनली. पुणे महापालिका आणि गरवारे ट्रस्टचा हा संयुक्त प्रकल्प आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचं उत्तम उदाहरण असलेलं गरवारे बालभवन मुलांच्या आनंदाचं ठिकाण आहे. आता याच मैदानाावर व्यंगचित्रदालन उभारण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक अशोक हणावळ यांनी मांडला.

गरवारे बालभवनवरचं हे काही पहीलं संकट नाही. याआधी शाहू स्मारक-पर्वती ते सारसबाग रोप वे करता स्टेशन असे प्रस्ताव मांडले गेले पण पालकांच्या -जागरूक पुणेकरांच्या एकजुटीमुळे ते मागे पडले. पण आता पुन्हा हजारो मुलांच्या हक्काच्या खेळण्याच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समृती जपण्यकरता उभ्या राहणार्‍या व्यंगचित्रकला दालनामुळे बालभवन नवं संकट आलंय. या नव्या संकटामुळे बालभवनचे संचालक चिंतेत सापडले आहेत.

पुणे शहर वेगानं वाढतंय. शैक्षणिक- सांस्कृतिक तसेच खेळाची राजधानी असं बिरूद मिळवणार्‍या या शहरात मुलांसाठी मात्र मोकळी मैदानं उरलेली नाहीत असं असताना शहरातील मध्यवर्ती असणार्‍या गरवारे बालभवनचा घास क्रीडाप्रेमी असलेल्या बाळासाहेबांच्या नावावर श्रेयाचं स्वस्त राजकारण करणारे महापालिकेतील राजकारणी आणि शहरातील बालकांच्या आनंदाशी काहीही घेणं देणं नसलेले अधिकारी घेणार का ? जागरूक आणि विचारी पुणेकर बालभवन वाचवण्याच्या मोहीमेत सामील होणार हा खरा प्रश्न आहे.

close