कर्जमाफीसाठी अपात्र शेतकर्‍यांचा मोर्चा

February 5, 2013 10:01 AM0 commentsViews: 29

05 फेब्रुवारी

2008 साली युपीए सरकारने लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन महत्वाकांक्षी 'कर्जमाफी योजना' जाहीर केली. देशभरातल्या पात्र शेतकर्‍यांना 71 हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा लाभ मिळणार होता. त्यानुसार, अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यातही आली. पण, महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे 45 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करावी, अशा नोटीसा बँकांनी शेतकर्‍यांना बजावल्या आहेत. याविरोधात शेतकर्‍यांनी पुण्यामध्ये साखर संकुल ते नाबार्ड अशा धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला. गावागावतले हजारो शेतकरी आज या आंदोलनात सहभागी झाले होते.

2008 साली केंद्र सरकारच्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांना कर्जमर्यादेपेक्षा जादा रक्कम अदा करण्यात आली. बोगस कर्ज दाखवून रक्कम वाटण्यात आली. त्यावर कॅगनं आक्षेप घेतला. आता ही रक्कम एक महिन्याच्या आत वसूल करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेनं दिलेत. तब्बल 45 हजार शेतकर्‍यांकडून आता ही रक्कम वसूल केली जाणार आहे. ही रक्कम वसूल करुन सरकार शेतकर्‍यांचंच नुकसान करतंय असा आरोप किसान संघटनेनं केलाय. तर ही वसूली बेकादेशीर आहे, असा आरोपही केलाय. बोगस कर्ज वाटप झालं असेल तर त्याची वसुली योग्यच असल्याचं खासदार सदाशिव मंडलिक यांनी म्हटलं आहे. तर याबाबत नाबार्डने एका समितीची नियुक्ती केली, त्याचा निर्णय अजून अपेक्षित आहे, असं सहकारमंत्र्यांनी सांगितल्यानं त्याबाबतचा संभ्रम अधिक वाढला. या वसुलीमुळे शेतकर्‍यांना येत्या रब्बी हंगामासाठीचं कर्ज मिळणार नाही असं दिसतंय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

close