ऐन उन्हाळ्यात लातूरमध्ये लाखो लीटर पाणी वाया

March 7, 2013 2:42 PM0 commentsViews: 18

07 मार्च

लातूर : शहराला पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली लातूर जिल्हा प्रशासनाने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर गोदावरी महामंडळाने बांधलेले वांजरखेडा उच्च पातळी बंधारा आहे. या बंधार्‍यामध्ये साठलेलं पाणी जिल्हा प्रशासनाने 1 मार्चला मांजरा नदीच्या खोर्‍यात सोडलं. खोर्‍यातून हे पाणी पुढच्या कारसापोरे गाव या बंधार्‍यामध्ये येणं अपेक्षित होतं आणि तिथून ते साई आणि नागझरी बंधार्‍यामध्ये आणलं जाणार आहे. साई-नागझरीतून पाईपने लातूरपर्यंत आणलं जाईल.

मात्र नदीचं कोरडं तहानलेलं पात्र, रणरणतं ऊन, नदीत शेतकर्‍यांनी पाडलेले शेकडो खड्डे आणि डोह यामुळे हे पाणी अपेक्षित प्रवाह करूच शकलं नाही आणि ठिकठिकाणी साचून राहिलं. त्यानतंर जिल्हाधिकार्‍यांनी धावपळ केली. जेसीबी प्रोक्लेन लावले. पात्र सपाट करण्याचा प्रयत्न केला. पण, पाणी फारसं हललं नाही. शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाला पात्रातून ऐन उन्हाळ्यात पाणी नेऊ नये अशी विनंती केली होती. त्याकडे प्रशासनाने अजिबात लक्ष दिलं नाही आणि बंधार्‍यातून सोडलेलं 2.70 एमएम क्यूब पाणी सोडलं. यातलं फक्त 0.50 एम.एम.क्यूब पाणी पुढच्या बंधार्‍यात पोचलंय. तिथून 14 किलोमीटर पाण्याचा प्रवास अजून व्हायचाय. ऐन उन्हाळ्यात वाया घालवलेल्या या पाण्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे.

close