‘शिलेदारा’विना ‘रणजी’ फायनल

January 24, 2013 4:02 PM0 commentsViews: 9

रुपा रमाणी, मुंबई

24 जानेवारी

रणजी क्रिकेट स्पर्धेची फायनल येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. मुंबई आणि सौराष्ट्र या दोन तगड्या टीम विजेतेपदासाठी आमने सामने आहेत. पण या दोन्ही टीमना त्यांच्या प्रमुख खेळाडूंविना फायनलमध्ये उतरावे लागणार आहे. कारण बीसीसीआयनं प्रमुख खेळाडूंना रणजीमध्ये खेळायला परवानगी नाकारली आहे.

बीसीसीआय अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करीत असतानाच सौराष्टानंही सुवर्ण कामगिरीची नोंद केलीय. रणजी क्रिकेटच्या 75 वर्षांच्या इतिहासात सौराष्ट्रानं पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक दिलीय. आणि तेही सेमीफायनलमध्ये पंजाबची कडवी झुंज मोडून..पण या जल्लोषाला भारताचे दोन आघाडीचे क्रिकेटर मात्र मुकलेत. सौराष्ट्राच्या रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजाराचा समावेश भारतीय वन डेत असल्यामुळेच त्यांना मुंबईविरुध्दच्या फायनलमध्ये खेळता येणार नाही आणि यासाठीचं सौराष्ट्रानं बीसीसीआयला त्यांच्या उपलब्धतेसाठी विनंती केलीय.

सौराष्ट्राप्रमाणेच मुंबईच्याही दोन खेळाडूंची भारतीय टीममध्ये वर्णी लागलीय. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे दोघंही सध्या भारतीय टीममध्ये चमकदार कामगिरी करु शकलेले नाही. पण रोहित शर्मानं मात्र रणजी मोसमात धावांचा पाऊस पाडलाय. सहा रणजी मॅचपैकी तीनमध्ये रोहित शर्मानं सेंच्युरी ठोकल्यात. आणि म्हणूनचं मुंबईसाठी तो उपयुक्त खेळाडू ठरू शकतो.

पण बीसीसीआयनं मात्र ही विनंती धुडकावून लावलीय. मुंबईनं आणि सौराष्ट्रनं खेळाडूंना उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी बीसीसीआयनं नाकारलीय. शेवटच्या दोन वन डेसाठी भारतीय टीमची घोषणा केली असल्यामुळे आता त्यात कोणतेही बदल होणे शक्य नाही असं सुत्रांचं म्हणणं आहे.

रणजीची ही फायनल मंुबईच्या वानखेडेवर स्टेडियमवर रंगणार आहे. आणि त्यात मुंबईकडून सचिन तेंडुलकर त्याच्या पाचव्या फायनलमध्ये खेळणार आहे. आजवर सचिननं चारवेळा विजेतेपद मिळवून दिलेत. त्यामुळे या रणजी मॅचसाठी वानखेडे हाऊसफुल होणार इतकं नक्की.

close