एचआयव्हीच्या ‘जबड्यातून’ चिमुकलीची सुटका

March 4, 2013 10:16 AM0 commentsViews: 8

04 मार्च

एचआयव्ही म्हणजे मृत्यू असं समीकरण जगभरात रुढ झालं असताना एका एचआयव्हीबाधित लहान मुलीला बरं करण्यात यश मिळाल्याचा दावा अमेरिकेतल डॉक्टरांनी केला आहे. मिसिसीपीमधील या मुलीला गर्भात असताना आईपासून एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. तिच्या जन्मानंतर 30 तासांनंतर तिला अँटी रेट्रो व्हायरल औषधे देण्यास सुरुवात केली. इतक्या लहान अर्भकासाठी उपचारपद्धती केली जात नाही. 15 महिने या लहानगीवर उपचार सुरू होते. ही मुलगी सध्या अडीच वर्षांची आहे. वर्षभरापूर्वी तिच्या आईने तिला औषधं देणं थांबवलं आणि डॉक्टरांकडंही नेलं नाही. तिच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या दिवशी आई तिला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा त्यांना तिच्यामध्ये एचआयव्हीची चिन्हं नव्हती. मिसिसिपीबाहेरच्या डॉक्टरांनीही तिची तपासणी केली तेव्हा त्यांनाही एचआयव्ही आढळला नाही. यानंतर किमान एचआयव्हीबाधित नवजात बालकांवर उपचार पद्धतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जगभरात सध्या 30 लाख लहान मुलं एचआयव्ही बाधित आहेत. त्यामुळे हा उपचार लाखो चिमुकल्यांना एचआयव्हीच्या जबड्यातून बाहेर काढू शकेल.

close