अखेर यंत्रमाग कामगारांचा संप मिटला

February 28, 2013 1:33 PM0 commentsViews: 79

28 फेब्रुवारी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांचा संप अखेर मिटला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ठप्प असलेली उलाढाल पुन्हा सुरु होणार असल्याने मँचेस्टरनगरीत पुन्हा यंत्रमागांचा खडखडाट सुरु होणार आहे. आपल्या विविध मागण्यासाठी कामगारांनी गेल्या 38 दिवसांपासून हा संप पुकारला होता. कामगार आणि मालक आपआपल्या मागण्यांवर ठाम असल्याने तोडगा निघत नव्हता. मात्र आजच्या कोल्हापुरमधल्या बैठकीत यावर तोडगा निघाला. कामगारांना 52 पिकाला यापुढे 87 पैसे वाढ तर 16.66 टक्के बोनस देण्याचं मालक संघटनांनी मान्य केलंय. तसंच यापुढे कामगारांची कामाची पाळी ही 12 तासांची असणार आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी सुट्टीचा दिवस असल्याने येत्या शनिवारपासून इचलकरंजीतले सव्वा लाख यंत्रमाग हे सुरु होणार आहेत. तर या संपामुळे घरी बसून असलेले सुमारे 50 हजार कामगार हे पुन्हा आपल्या कामांवर रुजू होणार आहेत. 38 दिवसांच्या या संपामुळे मँचेस्टरनगरीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होती. तसंच कामगारांचं घरंच बजेटही कोलमडलं होतं. मात्र आता संप मिटल्यामुळं कामगार सुखावले आहे.

close