स्वबळावरच लढणार : राज ठाकरे

February 13, 2013 6:51 AM0 commentsViews: 24

13 फेब्रुवारी 2013

कोल्हापूर – भविष्यात कुठल्याही पक्षासोबत युतीचा विचार नसल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा मैत्रीचा प्रस्ताव धुडकावून लावला. कोल्हापूरात मंगळवारी जंगी सभा घेऊन राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. युतीच्या चर्चा या वर्तमान पत्रातून होत नसतात असा टोलाही त्यांनी उध्दव यांना लगावला. मनसे आपल्या ताकदीवर पुढे येत असून स्वबळावर आम्ही सत्ता मिळवू असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा, टोलवसुली या मुद्द्यांवरून सरकारवर तोफ डागली. स्मारकं कशाला हवीत, त्यापेक्षा गडकिल्ल्यांचं संवर्धन करा, असं त्यांनी ठणकावलं. राज यांच्या महाराष्ट्र दौर्‍यातली ही पहिलीच सभा होती. कोल्हापुरातल्या गांधी मैदानवर झालेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेनेकडून दखल नाहीदरम्यान, राज यांच्या सभेची शिवसेनेनं दखलच घेतली नाही. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या `सामना` मध्ये कोल्हापूरच्या सभेची बातमीच सामनानं घेतली नाही.त्यावरून शिवसेना राज यांना महत्व देणार नसल्याची चर्चा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आजारपणात आणि निधनानंतर राज आणि उध्दव या भावांमधला दुरावा कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं मात्र आता दुरावा आणखी वाढणार हे स्पष्ट झालंय.

close