नितीन गडकरींचा राजीनामा

January 22, 2013 4:39 PM0 commentsViews: 22

22 जानेवारी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची दुसरी टर्म सुरू होण्याअगोदरच संपुष्टात आली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अखेरपर्यंत असणार्‍या नितीन गडकरींनी रात्री उशिरा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि दुसर्‍यांदा अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याची घोषणा केली. आता माजी अध्यक्ष राजनाथ सिंह पुन्हा एकदा भाजपचे अध्यक्ष होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आपल्या नावावर एकमत झालं नाही तर राजनाथ सिंहांना पाठिंबा असेल, असं गडकरींनी संघाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लालकृष्ण अडवाणी यांनी सुरुवातीला राजनाथ सिंहांच्या नावाला नापसंती दाखवली होती. पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि संघातला मोठा गट राजनाथ सिंहांच्या पाठिशी असल्याचं समजतंय.

पूर्ती ग्रुपमध्ये गैरव्यवहार प्रकरणामुळे अखेर नितीन गडकरींना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.नितीन गडकरींच्या पूर्ती ग्रुपमधून अनेक बेनामी कंपन्यातून गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं. याप्रकरणी सत्ताधार्‍यांनी तर भाजपाला धारेवर धरलंच पण भाजपमधील नेत्यांनीही गडकरींविरोधात मोर्चा उघडला. भाजपचे जेष्ठ नेते राम जेठमलानी,महेश जेठमलानी आणि खुद्द लालकृष्ण अडवाणी यांनी गडकरींच्या अध्यक्षपदाला विरोध केला होता. एवढेच नाही तर गडकरींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. पण संघाने गडकरींच्या 'छोट्या' चुका पोटात घेतल्या आणि गडकरींच्या अध्यक्षपदाच्या दुसर्‍या टर्मसाठी पाठिंबा दिला. एकीकडे संघाचा पाठिंबा आणि पक्षाअंतर्गत होतं असलेल्या विरोधामुळे गडकरींवर वादाचे ढग कायम घोंघावत होते. भाजप विरूद्ध संघ असाच सामना रंगला होता. मात्र भाजपच्या नेत्यांनी आपला विरोध कायम ठेवला. गडकरींच्या विरोधात आज दुसर्‍यांदा बैठक भरली आणि अखेर गडकरींना माघार घ्यावी लागली. नितीन गडकरींनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला आहे. मी कोणताही घोटाळा केला नाही.माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहे. याप्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत. यापुढे आता मी पक्षासाठी काम करणार अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली. विशेष म्हणजे भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी बुधवारचा अखेरचा दिवस होता. पण राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि गडकरींचे अध्यक्षपदाची स्वप्न'पूर्ती' भंग झाली. राजनाथ सिंग भाजपचे नवे अध्यक्ष होणार आहे. राजनाथ सिंग यांनी भाजप नेत्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे सिंग अध्यक्षपदाची धूरा सांभाळतील हे जवळपास स्पष्ट झालंय.

भाजपमध्ये दिवसभरातील घडामोडी

- सायंकाळी 5:30 ते 6 उत्तन येथे लालकृष्ण आडवाणी, नितीन गडकरी आणि भैय्याजी जोशी यांची बैठक- या बैठकीत अडवाणींचा गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध. यशवंत सिन्हांची केली शिफारस- गडकरी यांनी स्वता:ऐवजी राजनाथ सिंग यांची केली शिफारस- अडवाणींचा राजनाथ सिंग यांना पाठिंबा- भैयाजींचा सरसंघसंचालक मोहन भागवत यांना फोन. राजनाथ सिंग यांच्या नावावर सहमती झाल्याचा निरोप- मोहन भागवत यांनी रामलाल आणि सुरेश सोनी यांना राजनाथ यांच्या उमेदवारीवर अरुण जेटलींकडे चाचपणी करण्यास सुचवले- सायंकाळी 7:30 वाजता रामलाल जेटलींच्या निवासस्थानी दाखल- जेटलींचा राजनाथ सिंग यांच्या नावास पाठिंबा, पण यशवंत सिन्हांसाठी पुन्हा प्रयत्न. पण आरएसएस कडून राजनाथ सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब, जेटलींचंही समर्थन- सायंकाळी 8 वाजता रामलाल यांची जेटली आणि सुश्मा स्वराज यांच्यासमवेत बैठक- सुषमा स्वराज यांचंही राजनाथ सिंग यांच्या नावाला समर्थन- सायंकाळी 8:45- रामलाल यांच्याकडून मोहन भागवत यांचा भैय्याजींना निरोप. राजनाथ सिंग यांच्या नावावर सहमती- भैय्याजीकडून अडवाणी आणि नितीन गडकरी यांना राजनाथ सिंग यांच्या नावावर एकमत झाल्याचा निरोप- रात्री दहा वाजता गडकरी यांचं राजीनामा देत असल्याचं निवेदन.

close