प्रेमप्रकरणातून घडले सोनईतील तिहेरी हत्याकांड

January 29, 2013 5:37 PM0 commentsViews: 63

29 जानेवारी

अहमदनगरच्या नेवासे तालुक्यातल्या सोनई गावात तिहेरी हत्याकांड प्रकरणाला महिना पूर्ण होत आला आहे पण हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलेले नाही. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाल्याची तक्रार पीडित तरुणांचे नातलग करत आहेत. खोट्या प्रतिष्ठेसाठी झालेल्या या ऑनर किलिंगला सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर वाचा फुटलीय.

1 जानेवारीला संदीप थनवर(24), सचिन धारू(26) आणि राहुल कंदारे (26) या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघे नेवाशातल्या त्रिमुर्ती शिक्षण संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करत होते. घटनेत संदीप थनवर यांचा मृतदेह चेंबरमध्ये सापडला होता. त्याचे डोके,हात,पाय तोडून चेंबरच्या कुंपनलिकेत टाकले होते. तर सचिन धारू आणि राहुल कंदारेची हत्या करून शेजारील विहिरीत पुरले होते. सचिन धारूचे मुंडके,हात आणि पाय तोडण्यात आले होते. कडब्याच्या कोयत्याने हाता पायाचे तुकडे करुन या हत्या करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. आणि स्वत:चं पोलिसांना फोन करून या तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांना हे तिहेरी मृत्यूप्रकरण संशयास्पद वाटलं त्यातून त्यांनी प्रताप दंरदले आणि रमेश दंरदले या दोन बंधूंना अटक केली आहे. पण हत्येच्या कारणापर्यंत तपास जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. सचिन धारु याचे दुसर्‍या जातीतील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून मुलीच्या भावांनी सचिनसह त्याच्या भावांना ठार मारलंय असा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची तक्रार नोंदवली असली तरी त्यांची योग्य ती दखल घेतली नसल्याची तक्रार टास्क फोर्सच्या चौकशीत पुढं आलंय. मानवी हक्क अभियान, माणुसकी आणि भंगी समाज मुक्ती मोर्चा या संस्थांच्या वतीनं हा टास्क फोर्स नेमण्यात आला होता.

close