‘महायुतीत मनसे सहभागी होण्याची बातमी खोटी’

March 8, 2013 9:53 AM0 commentsViews: 23

08 मार्च

राज ठाकरे महायुतीमध्ये येण्यास तयार असल्याची बातमी एका प्रमुख मराठी दैनिकानं छापली. आणि त्यानंतर राजकीय तर्कवितर्क सुरू झाले. पण मी महायुतीत यायला तयार आहे, ही बातमी धादांत खोटी आहे असं खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. अशा कोणत्याही स्वरूपाचा विचार मी करत नाही. तसंच या बातमीतला मजकूर पूर्णपणे खोटा असून माझ्या पक्षाबाबतची आकडेवारी ही चुकीची दिली आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतकडे दिली आहे. आज मुंबईतल्या एका प्रमुख मराठी दैनिकात मनसे महायुतीत यायला राजी आहे अशा आशयाची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर राज ठाकरेंनी आपली ठाम भूमिका मांडली. या अगोदरही राज यांनी युतीत यावे यासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केला होता. मात्र राज ठाकरेंनी टाळी ऐवजी टोला देऊन स्पष्ट नकार दिला होता.

शिवसेना मनसे नजीकच्या भविष्यात एकत्र का येणार नाहीत ?

1. उद्धव आणि राज यांची दुखावलेली मनं अजून सांधलेली नाहीत2. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी राजना अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात आहे.3. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धवनी राज यांच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही.4. उद्धव यांच्या काही निकटवर्तीयांना हे दोन भाऊ एकत्र यावेत, असं वाटत नाही. यामध्ये संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होतो5. उद्धव आणि राज एकत्र आले तर राज वरचढ ठरतील, अशी भीती शिवसेना नेत्यांच्या मनात आहे6. राज यांच्या मनातही उद्धवविषयी विश्वास नाही. आपल्या आगामी दौर्‍यातली हवा काढण्यासाठी उद्धव आणि संजय राऊत हे राजकारण करत आहेत, असा संशय त्यांच्या मनात आहे7. मनसेचा विस्तार हा राज यांचा सध्याचा अजेंडा आहे, त्यामुळे या वर्षी तरी शिवसेनेशी युती करण्याचा ते विचार करणार नाहीत8. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना विस्कळीत झाली आहे. उद्धव यांच्या जवळच्या नेत्यांत रस्सीखेच सुरू आहे. या सगळ्यावर पांघरूण घालण्यासाठी उद्धव यांनी मनसेच्या युतीचं हे गाजर पुढे केलं आहे

close