हैदराबाद स्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीनच ?

February 25, 2013 4:54 PM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीननेच केले आहेत हे आता निश्चित मानून पुढचा तपास सुरू आहे. सायकलींचा वापर, बॉम्बमधले विशिष्ट रासायनिक घटक आणि ते घटनास्थळापर्यंत बॉम्ब पोहोचवण्याची पद्धत.. या तिन्हींवरून मुजाहिद्दीनचा हात स्पष्ट होतोय. आतापर्यंत 2006 पासून भारतात झालेल्या 7 स्फोटांशी या संघटनेचा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे मुजाहिद्दीनचे म्होरके असलेले भटकळ बंधू सध्या भारतातले मोस्ट वाँटेड अतिरेकी आहेत. मुंबईतला 26-11चा हल्ला सोडला, तर गेल्या 6 वर्षांतल्या सगळ्या स्फोटांमागे यासीन, रियाझ आणि इक्बाल हे तिघे भटकळ बंधू होते. गेल्या 4 वर्षांत मुजाहिद्दीनची वाढ झपाट्याने झाली आहे. आतापर्यंत 5 राज्यांतून मुजाहिद्दीनच्या 93 ऑपरेटिव्हजना अटक करण्यात आली. पण मुजाहिद्दीनने स्फोट घडवून आणण्यासाठी आऊटसोर्सिंग करत असल्यामुळे पोलीसही हतबल झालेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमधल्या छोट्या शहरांतून ते तरुणांची भरती करतात. स्थानिक पक्ष धर्मावर आधारित राजकारण करून तरुणांमधल्या असंतोषाला खतपाणी देतात, असा दावा तपास करणार्‍या पोलिसांनी केलाय. तिघे भटकळ बंधू पाकिस्तान ते शारजा ते दुबई.. अशी आपली ठिकाणी बदलत असतात. सध्या दाऊद आजारी आहे, त्याचा धाकटा भाऊ बांधकाम व्यवसायात रस घेतोय आणि छोटा शकील कॉर्पोरेट क्षेत्रात दबदबा निर्माण करतोय. कमजोर होत असलेल्या डी-कंपनीची जागा भटकळ बंधू भरून काढत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

close