शिंदेंची बडबड, ‘त्या’मुलींची नावं उच्चारली

March 1, 2013 9:47 AM0 commentsViews: 57

01 मार्च

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सरकार अडचणीत सापडले आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या निवदेनात भंडारा बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या मुलींची नावं जाहीर केली. बलात्कार प्रकरणातील पीडित मुलींचं नावं कधीही जाहीर करू नये अशी खबरदारी घेतली जाते तशी कायद्याने बंदी आहे. पण गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत निवेदन देताना हा घोळ केला आहे. शिंदेंच्या या निवेदनावर विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते अरूण जेटली यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. बलात्कारातील पीडित तरूणींचे नाव कोणीही जाहीर करू नये असा नियम आहे. पण गृहमंत्र्यांनी याचे भान सुद्धा ठेवले नाही. त्यांनी तिन्ही मुलींची नाव घेऊन चुकी केली आहे. गृहमंत्र्यांना हे समजले पाहिजे होते. त्यांनी निवेदन दुरस्त करून पुन्हा नव्यानं मांडावे अशी सुचनाही जेटली यांनी केली. यानंतर अखेर राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांनी तातडीने कामकाजातून शिंदेंचं वक्तव्य वगळून टाकलं. हे प्रकरण खूप गंभीर आहे यांचं गांभीर्य सर्वांनी ठेवलं पाहिजे. प्रसारमाध्यमांनीसुद्धा या मुलींची नावं जाहीर होऊ देऊ नये अशी सुचनाही त्यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी आपला अहवाल सादर केल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. मुंलींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचा खून करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तर या प्रकरणी तपासात हलगर्जीपणा केल्याबद्दल एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. याअगोदर या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत-प्रभावळकर, विजया बागडे आणि स्मिता सिगालकर यांचा यात समावेश होता. ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन क्रियाशील नसून पोलिसांचा वचक नसल्याचं मत या सदस्यांनी नोंदवलं. या प्रकरणात एक फॉरेन्सिक रिपोर्ट आला असून 2 रिपोर्ट यायचे आहेत असंही त्यांनी सांगितलं. तर, भंडार्‍याच्या एसपींना निलंबीत करा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली.

close