दुष्काळग्रस्तांनी बांधली जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरं

February 4, 2013 10:16 AM0 commentsViews: 25

04 फेब्रुवारी

मिरज पूर्व भागातील दुष्काग्रस्त शेतकर्‍यांनी सोमवारी आपली जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधली आहेत. मिरज पूर्व भागातील सतरा गावे म्हैशाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याने भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्यासह पन्नास शेतकर्‍यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मिरज तालुक्यातून पुढील कवठेमहांकाळ,तासगाव आणि जत तालुक्यात म्हैसाळ जलसिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. मात्र मागील दहा वर्षापासून मिरज पूर्वभागातील सतरा गावे तहानलेली आहेत. या गावात पिण्याच्या पाण्याची आणि चार्‍याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. बनेवाडी येथील कालव्यातून पाणी उपसा करून भोसे तलावात सोडण्याची योजना आहे. त्याची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. केवळ वीज पंप आणि वीज जोडणी केली नसल्याने पाणी तलावात पोहचू शकले नाही. येथील भोसे ,सोनी,करोली, पाटगाव, कळबी, सिध्देवाडी, मानमोडी, खरकटवाडी या गावातील लोक पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. तर म्हैशाळ योजनेपोटी कालव्याची कामे झाली नसल्याने एरडोली, खडेराजुरी ,मालगाव, गुंडेवाडी या सारख्या नऊ गावात पाणी आले नाही.

close