अरुण जेटलींचे फोन सरकारने टॅप केले नाहीत -शिंदे

March 1, 2013 10:15 AM0 commentsViews: 10

01 मार्च

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांच्या फोन टॅपिंगच्या मुद्यावरून गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आज विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. शिंदे यांनी राज्यसभेत निवेदन करताना दावा केला की, हे प्रकरण फोन टॅपिंगचे नसून खाजगी गुप्तहेरांनी जेटली यांच्या फोन कॉलची माहिती घेतली आहे. मात्र, हे प्रकरण गंभीर आणि बेकायदेशीर असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. या प्रकरणी काही जणांना अटक झाल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपच्या अंतर्गत राजकीय स्पर्धेतून जेटली यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण उद्भवल्याचा आरोप आधी काँग्रेसने केला होता. मात्र, भाजपसह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष तसेच डाव्या पक्षांनी या टिपण्णीवरून शिंदेंवर जोरदार टीका केली. आपलाही फोन टॅप होत असल्याचा आरोप माकपचे सीताराम येंचुरी यांनी केला. तर सरकारच्या अनुमतीशिवाय फोन टॅपिंगचे प्रकार होणे शक्य नसल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. मात्र, विरोधकांचे आरोप शिंदे यांनी फेटाळून लावले. सरकारने जेटली यांच्या फोन टॅपिंगचा आदेश दिला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

close