अखेर शिंदेंनी व्यक्त केली दिलगिरी

February 20, 2013 4:24 PM0 commentsViews: 24

20 फेब्रुवारी

संघ आणि भाजपा दहशतवादाचे अड्डे चालवत आहे असं अत्यंत खळबळजनक वक्तव्य करून भाजप आणि संघाच्या गडावर टीकास्त्र सोडणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. मी केलेल्या वक्तव्याबाबत गैरसमज झाला. मी दहशतवादाचा संबध एका विशिष्ट धर्माशी जोडतोय आणि काही संघटना दहशतवादी प्रशिक्षण कॅम्प चालवतात असा आरोप केल्याचा समज झाला. दहशतवादाचा संबंध एका विशिष्ट धर्माशी जोडण्याचा माझा हेतू नव्हता.माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावलं असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. भारतात सामाजिक सलोखा राहावा यासाठी मी माझं कर्तव्य करत राहीन असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मागिल महिन्यात 19 जानेवारीला जयपूरच्या काँग्रेसच्या मेळाव्यात संघ आणि भाजपा दहशतवादाचे अड्डे चालवत आहे असा खळबळजनक वक्तव्य करून एक 'वाद'कल्लोळ निर्माण केला होता. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि संघाने तीव्र आक्षेप घेत कडाडून विरोध केला. शिंदे जर माफी मागितली नाही तर संसदेत शिंदे यांना काम करू देणार नाही असं भाजपनं तातडीने जाहीर केलं होतं. तरीही शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त न केल्यामुळे अखेर संसदेचं बजेट अधिवेशनच चालू देणार नाही अशी टोकाची भूमिका आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाजपाने घेतली. शिवाय, आज भाजपाने दिल्लीत संसद मार्गावर शिंदे यांचा निषेध करणारी एक रॅलीसुद्धा आयोजित केली होती. भाजपाचा हा टोकाचा विरोध लक्षात घेता अखेर काँग्रेसच्या वतीने संध्याकाळी यावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक सोनिया गांधी यांच्या घरी झाली. या बैठकीत शिंदे यांनी एक पत्रक काढावं असं ठरलं. त्यानुसार रात्री आठ वाजता शिंदे यांनी हे दिलगिरी व्यक्त करणारं पत्रक जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे बजेट अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाच आहे आणि बजेट अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी प्रयत्नही केला आहे.

सुशीलकुमार शिंदे नेमकं काय म्हणालेत पाहूया…

'गेल्या महिन्यात जयपूरमध्ये मी केलेल्या वक्तव्याबाबत गैरसमज झाला. मी दहशतवादाचा संबध एका विशिष्ट धर्माशी जोडतोय आणि काही संघटना दहशतवादी प्रशिक्षण कॅम्प चालवतात असा आरोप केल्याचा समज झाला. दहशतवादाचा संबंध एका विशिष्ट धर्माशी जोडण्याचा माझा हेतू नव्हता. जयपूरमध्ये मी केलेल्या भाषणाचा उद्देशही तो नव्हता. माझ्या वक्तव्यावर वाद निर्माण करण्यात आला. तेव्हापासून मी यावर स्पष्टीकरण देतोय आणि माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावलं असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. भारतात सामाजिक सलोखा राहावा यासाठी मी माझं कर्तव्य करत राहीन.'

close