भंडारा बलात्कार, खून प्रकरणी अजूनही आरोपी मोकाटच

February 21, 2013 9:43 AM0 commentsViews: 19

21 फेब्रुवारी

भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी गावात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणामुळे सध्या संताप उसळला. 7 दिवस उलटलेत पण तरीही या प्रकरणात अजून कोणालाही अटक झालेली नाही. गरज पडली तरी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल असं केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्कार, खून आणि अनैसर्गिक कृत्यासंदर्भातील गुन्हे दाखल केले आहेत. तर आत्तापर्यंत संशयित म्हणून 3 जणांना याप्रकरणी ताब्यातही घेतलं गेलंय.

14 फेब्रुवारीला तनुजा, प्राची आणि प्रिया या त्यांच्या 3 अल्पवयीन मुली शाळेत तर गेल्या, पण संध्याकाळी घरी परतल्या नाहीत. शोध घेऊनही सापडत नसल्यानं घरच्यांनी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांत नोंदवली. पण 16 फेब्रुवारीला शेतातील एका विहीरीत या तीनही मुलींचे मृतदेह सापडले होते. यानंतर पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये या मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचं उघड झालं. या संपुर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होतोय. लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश मुंडे यांनी हे प्रकरण तितकं गांभीर्यानं घेतलं नसल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केलं आहे. या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अडवून भंडारा जिल्हा बंदची हाक दिली गेली होती. तर या बंदला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या भंडारा जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

close