सोलापुरात लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाऊबंदकी

February 25, 2009 3:58 AM0 commentsViews: 73

25 फेब्रुवारी पंढरपूर सुनील उंबरेसोलापूर जिल्ह्यातील मातब्बर घराणं म्हणजे मोहिते पाटील घराणं. गेली 30 वर्ष मोहिते पाटील घराण्याचंच राज्य सोलापुरात सुरू आहे. पण या घराण्यात आता भाऊबंदकी सुरू झाली आहे. राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात त्यांच्या लहान भावानं प्रतापसिंहांनी बंड केलंय. हे बंड शमवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू आहेत.प्रतापसिंह मोहिते पाटील हे शंकरराव मोहिते पाटलांचे तिसरे चिरंजीव. वय वर्ष एकोणसाठ. आत्तापर्यंत प्रतापसिंह हे मोठे भाऊ विजयसिंहांची सावली होते. विजयसिंह यांच्या मताप्रमाणं वागायचे. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली. 1998 मध्ये प्रतापसिंह भाजपमध्ये गेले. त्याचं बक्षीस त्यांना मिळालं. विधानपरिषदेत ते आमदार बनले लागलीच त्यांना सहकार राज्यमंत्री पदही मिळालं. म्हणजे काँग्रेसची सत्ता गेली तरी मोहिते घराण्यात लाल दिवा कायम राहिला. 2003 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंहांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला पाडलं. खासदार झाले. 2004 साली ते पुन्हा विधानपरिषदेत आमदार बनले ते आजतागायत.गेली दहा वर्ष आमदार वा खासदार असून सुध्दा आता प्रतापसिंहांना वाटतंय की त्यांच्यावर फार अन्याय होतोय. त्यांना स्वत:ला पुन्हा लोकसभेत जायचंय. परंतु विजयसिंहांना आपला मुलगा रणजित देशमुख याला खासदार करायचंय.त्यामुळं प्रतापसिंहांनी बंडाचा झेंडा उभारलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याची त्यांनी धमकी दिली आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील सांगतात, ही निवडणूक मी लढलो नाही तर माझं राजकीय करिअर संपेल. पुत्रप्रेम सर्वांचच असतं. यात इतकं मोठं काही नाही.गेल्यावेळी खासदार म्हणून निवडूनआल्यानंतर चार महिन्यातच मी खासदारकीचा त्याग केला होता. तो त्याग कोणासाठी केला, असा सवालही त्यांनी केला. यावर विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्याग कोणासाठी केला हे त्यांनाच विचारा मी जास्त काही बोलणार नाही असं सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकजण असे आहेत ज्यांनी आयुष्यभर मोहिते पाटील घराण्यातील उमेदवारांच्या निवडणुकीची पोस्टर्स लावण्याचीच कामं केली. पण या सामान्यांना कोणती पदं मिळाली नाहीत. खरंच महाराष्ट्रात घराणेशाही कुठे असेल तर ती सोलापुरात जरूर आहे.

close