जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

March 1, 2009 9:29 AM0 commentsViews: 5

1 मार्च नाशिकनाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतचा ठराव पास करण्यात आला. काँग्रेसने, राष्ट्रवादीला लोकसभा आणि विधानसभेच्या 50 टक्के जागा द्याव्यात असा ठराव या मेळाव्यात मंजूर करण्यात आला. राज्यात विधानसभेच्या 144 आणि लोकसभेच्या 24 जागा राष्ट्रवादीला द्याव्यात अशी मागणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.या मेळाव्याचं स्वागतपर भाषण उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं. जागावाटपात राष्ट्रवादीला समान वागणूक मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. तसंच शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा ठेवण्यात चूक काय असा सवाल त्यांनी यावेळी केला.दरम्यान काँग्रेसने युपीएतील घटक पक्षांना, देशभरात काही जागा सोडल्या तर आघाडीला याचा फायदा होईल असं मत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलंय.या भाषणात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, गोवा, लक्षव्दीप, ओरिसा, हरयाणा, आसाम, मेघालय, मणिपूर, बिहार या राज्यांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. अन्य राज्यात इतर पक्षांसोबत जाण्याचा विचार अद्याप केला नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पण राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससोबत जाण्यामध्येच रस असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.मात्र राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसनं घटक पक्षांसोबत जाणार नसल्याचं म्हटलंय, त्यामुळे नाईलाजास्तव राज्यपातळीवर राष्ट्रवादीला इतर पक्षांसोबत जावं लागेल असा टोलाही पवार यांनी हाणला. जम्मू-काश्मीरमध्ये नंबर दोनचं स्थान असतानाही काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाचा दावा केला, त्याच हिशेबानं राष्ट्रवादी राज्यात मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे असंही पवार म्हणाले. राज्यातल्या जागावाटपाबाबतचा निर्णय हा निरपेक्ष वृत्तीनं सोडवावा. तसंच आम्ही जास्त जागा मागत नसून ज्या जागेवर आम्हाला जिंकून येण्याची खात्री आहे, त्याच जागा मागत असल्याचं स्पष्टीकरणही पवारांनी दिलं.

close