राष्ट्रवादीचे 6 मंत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

March 2, 2009 6:00 AM0 commentsViews: 7

2 मार्च

अमेय तिरोडकरयेत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्य मंत्रिमंडळातील आपल्या मंत्र्यांना उमेदवार म्हणून उतरवणार आहे. आपल्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून यावेत अशी यामागची रणनीती असल्याचं कळतंय. यानुसार राष्ट्रवादीचे एकूण सहा मंत्री यावेळी उमेदवार म्हणून उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सहा मंत्र्यांमध्ये परभणी इथून सुरेश वरपूडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल. डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी वरपूडकर यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. तसंच जालना इथून राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा चालू आहे. टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे हे सुद्धा इथून इच्छुक आहेत. पण, तरूण उमेदवार देण्याचं पक्षाचं धोरण ठरलं असल्याचं कळतंय. बुलढाणा लोकसभेच्या जागेतून डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या मतदारसंघातील मराठा समाजाचं वर्चस्व बघता शिंगणे हे उमेदवार म्हणून पक्षाला योग्य वाटत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना उमेदवारी देण्यात येईल. तर मुंबईतील उत्तर – पश्चिम मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाणार आहे. इथे मुस्लिम मतदारांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नवाब मलिक यांची वर्णी लागेल. जागावाटपात राष्ट्रवादीने नंदूरबार मतदारसंघाची मागणी केली असल्यामुळे इथून डॉ. विजयकुमार गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे. सध्या इथे माणिकराव हे काँग्रेसचे खासदार आहेत. पण, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळावर इथे सत्ता खेचून आणली. त्यामुळे इथून उमेदवारीसाठी तयार रहा असे आदेश डॉ. गावितांना गेले आहेत. जागावाटपाबाबतची बोलणी अजून पूर्ण झाली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीची अचूक रणनीती ठरवली असल्याचं यावरून दिसतंय.

close