फ्रायडे रिलीज

March 5, 2009 1:24 PM0 commentsViews: 2

5 मार्च पुन्हा एकदा वीकेण्ड जवळ आला आहे. आणि यावेळी सिनेमाचे बरेच चॉइस आहेत. अगदी ऑस्करपर्यंत पोचलेल्या हॉलिवूड सिनेमांपर्यंत ते विनोदी हिंदी सिनेमापर्यंत. ' ढुंढते रह जाओगे ' सिनेमातून परेश रावल आणि जॉनी लिव्हरची आणखी एक तुफान कॉमेडी पाहायला मिळणार आहे. एका निर्मात्याला सिनेमा बनवायचा आहे आणि तोही फ्लॉप सिनेमा, ही सिनेमाची वन लाइन आहे. उमेश शुक्ला दिग्दर्शित हा सिनेमा फ्लॉप होतोय की हिट ते बघायचंय. ' कर्मा और होली ' हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. हिंदी आणि इंग्लिश भाषेत हा सिनेमा आहे. परदेशी राहणार्‍या एका जोडप्याची ही गोष्ट आहे. आपल्या लग्नात काही स्पार्क उरला नाही, असं वाटत असताना हे दोघं आपल्या घरी एक पार्टी आयोजित करतात आणि तेही होळीच्या निमित्तानं आणि त्यातूनच सिनेमा पुढे जातो. हॉलिवूडचे दोन सिनेमे महत्त्वाचे आहेत. पहिला आहे रिव्हॉल्युशनरी रोड. 1950सालची ही कथा आहे. यात आहे एका जोडप्याच्या आयुष्यातला संघर्ष. लिओनार्दो डीकॅप्रिओ आणि केट विन्सलेट टायटॅनिक सिनेमाचा इतिहास पुन्हा निर्माण करू शकतात का, ते पाहायचं. ऑस्करसाठी या सिनेमाला तीन नॉमिनेशन्स होती.' द रिडर ' या सिनेमासाठी केट विन्स्लेटला बेस्ट ऍक्टरेसचं ऑस्कर ऍवॉर्ड मिळालं. ही गोष्ट घडते जर्मनीमध्ये. पंधरा वर्ष वयाचा मायकल बर्ग आणि तिशीतली हॅना यांची ही लव्हस्टोरी. पण अनेक वर्षांनंतर हॅनाबद्दलचं सिक्रेट जेव्हा मायकेलला समजतं तेव्हा त्याचं जीवनच बदलून जातं. विजय दीनानाथ चौहान..अमिताभचं अग्निपथमधलं हे नाव. याच नावाचा मराठी सिनेमाही या आठवडयात रिलीज होत आहे. अशोक शिंदे मुख्य भूमिकेत आहे. यातल्या नायकाला अमिताभचा सिनेमा पाहून आपणही अमिताभ असल्याचं वाटायला लागतं, अशी कथा आहे. एकंदर सिनेमे बरेच आहेत, आता वीेकेन्डला कोणता सिनेमा बघायचा हे ठरवण्याएवढा स्मार्टनेस तुमच्यात आहेच.

close