ग्रेट भेट मध्ये अनिल अवचट

October 25, 2008 6:26 PM0 commentsViews: 247

अनिल अवचटग्रेट-भेटमध्ये आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध लेखक अनिल अवचटांची मुलाखत घेतली. अनिल अवचट एक लेखक आहेत पण त्याच बरोबर त्यांच वर्णन सामाजिक भान असलेला मनमौजी असंही करता येईल. ओरिगामी, शिल्पकला, फोटोग्राफी अशा छंदानी समृद्ध आयुष्य अवचटांनी जोपासलंय. त्याच्याच भाषेत सांगायचं तर ते म्हणतात, मी वेडयागत जगतोय. अनिल अवचटांचं मूळ गाव ओतूर. या गावानं अवचटांना खूप काही दिलं. गावातील प्रतिष्ठित घराण्यात जन्म झाला असला तरी सर्व जाती-जमातींमध्ये ते वावरले. ओतूरने त्यांना समाजाचं भान दिलं.डॉक्टरच्या मुलानं डॉक्टर व्हावं या न्यायानं अवचट मेडिकला गेले खरे पण त्यांचं मन त्यात रमलं नाही. मेडिकलला त्यांचा सुनंदाशी परिचय झाला आणि तिच्यामुळेच त्याचं एमबीबीएस पूर्ण झालं. ती सतत आधारासारखी त्याच्या मागे उभी राहिल्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात अवचटांना ख-या अर्थाने मुक्त जगता आलं. त्यांच्यामते सुनंदामुळे त्यांना जीवन जगण्याचा स्पेस मिळाला.आईकडून त्यांना कलेचा वारसा मिळाला.शिवायओतूरची संस्कृती वेगळी होती. गावात खेळताना भोवरा बनवणं, सणावाराला, बैलपोळयाला घरची मूर्ती स्वत: तयार करणं अशा गोष्टीचं पुढे छंदात रुपांतर झालं. युक्रांदमधल्या चळवळीतला सहभाग, बाबा आढावाबरोबरचं काम, बिहार मधलं समाजकार्य यामुळे त्यांना तळागाळातील माणसांना जाणून घेता आलं. बाबा आढाव, कुमार सप्तर्षी यांच्यामुळे ते समाजकार्यात ओढले गेले. पण पूर्णवेळ कार्यकर्ता होणं त्यांना जमलं नाही. जे जमत नाही, जिथं मन रमत नाही, तिथून निघून जाणं त्यांनी पसंत केलं.जे पटतं तसं जगण्यात खरी मजा आहे असं त्यांना वाटतं. जगताना, जे सांगावसं वाटलं तसं लिहलं आणि त्यातूनच शैली घडत गेली. अवचटांनी फार ठरवून असं लिहलं नाही. लेखनात त्यांना स्वत:चा आनंद गवसला.सुनंदानं सुरू केलेला आणि नंतर अवचटांनी मनापासून जोपासलेला प्रकल्प म्हणजे मुक्तांगणचं व्यसन मुक्ती केंद्र.या प्रोजेक्टसाठी त्यांना पुलंनी मदत केली होती.मुलाखतीच्या शेवटी अवचटांनी मन लागो यार फकिरीमें हे भजन गायलं. त्या शब्दांचं सार अवचटांच्या जीवनात उतरलंय हे या ग्रेटभेटमध्ये जाणवलं.

close