काळजी ठेवणीतल्या कपड्यांची – फॅशन डिझायनर लीना टिपणीस

November 6, 2008 1:47 PM0 commentsViews: 110

ठेवणीतले कपडे आपण सहसा नेहमी वापरत नाही. सुटकेसमध्ये बंद करून ठेवतो आणि मग एखाद्या सणाला किंवा शुभ कार्याच्यावेळी अशा ठेवणीतल्या कपड्यांच्या घड्या मोडल्या जातात. बहुतेकदा असे ठेवणीतले कपडे घडीच्या ठिकाणी फाटतात. काही काही वेळेला तर त्या कपड्यांची जर काळी पडते. यासाठी ठेवणीतल्या कपड्यांची काळजी घ्यावी लागते. कपड्यांची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक साबण , फ्रेशनर आहेत. पण ते वापरायचे कसे याची आपल्याला निटशी माहिती नसते. तीच माहिती 'टॉक टाइम'मध्ये मिळाली. 'ठेवणीतल्या किंवा सणासुदीला घालण्याच्या कपड्यांची काळजी' या विषयावर फॅशन डिझायनर लीना टिपणीस यांनी मार्गदर्शन केलं. प्युअर सिल्कच्या कपड्यांची विषेश काळजी घ्यावी लागते. ते घरी कपडे धुवायचे नाहीत. नेहमी ड्रायक्लिनिंगलाच द्यायचे. कपडे किमान दोन वेळा वापरल्यानंतरच धुवायचे.एकदा वापरलेले कपडे उन्हात वाळवून मगच घडी करायचे. त्यामुळे तेच कपडे दुस-यांदा वापरताना घामाचा वास येत नाही. सिल्कच्या कपड्यांवर डायरेक्ट सेंट वापारायचा नाही. त्याऐवजी डिओचा वापर केलेला उत्तम. सिल्कच्या साड्यांची घडी घालताना टिश्यू पेपरचा वापर करायचा. त्यामुळे त्या कपड्यांत ओलसरपणा रहात नाही .टिश्यू पेपर एैवजी बटर पेपरवर साडी रोल करून ठेवली तरी चालेल .जरी काळी पडली तर पॉलीश करायची. पण सारखी पॉलीश नाही करायची. या जरीला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची. कारण पाण्यामुळेच सर्वात जास्त जर काळी पडते. आजकाल पुरुषांमध्ये शेरवानी आणि ब्लेझरची फॅशन आहे .या कपड्यांना ठेवण्यासाठी खास झिप हॅन्गर येतात. त्यावर प्लास्टिक कव्हर असतं. त्यातच हे कपडे अडकवून ठेवायचे. शेरवानी आणि ब्लेझरची घडी घालणं टाळायचं. या कपड्यांनाही महिन्यातून एकदा ऊन दाखवायचं. कोटवर बसलेली धुळ साफ करण्यासाठी खास ब्रश येतात. त्याचा वापर करायचा. या आणि अशा अनेक प्रकारच्या टीप्स लीना टिपणीस यांनी दिल्या.

close