लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित प्रकरणामुळं लष्कराच्या प्रतिमेला तडा गेलाय का ?

November 9, 2008 1:15 PM0 commentsViews: 8

मालेगाब बॉम्बस्फोटाच्या तपासातून रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. पहिल्यांदाच लष्काराच्या सेवेतला एक अधिकारी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याची धक्कादायक माहिती उघडकीला येत आहे. याप्रकरणी लष्कराच्या आणखी तीन अधिकार्‍यांची चौकशी करण्याची परवानगी एटीएसनं मागितली आहे. धार्मिक विद्वेषाच्या भावनेनं आता लष्कराला पोखरल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर 'आजचा सवाल ' मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित प्रकरणामुळं लष्कराच्या प्रतिमेला तडा गेलाय का ? यावर चर्चा घेण्यात आली.यात निवृत्त ले. कर्नल जयंत चितळे,आयबीएन-लोकमतचे नाशिक ब्युरो चीफ निरंजन टकले आणि मेजर सुधीर सावंत सहभागी झाले होते. मालेगाव स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेले लष्करी अधिकारी प्रसाद पुरोहित हे जयंत चितळे यांचे विद्यार्थी होते. ' तो अप्रतिम अधिकारी आहे. पण अद्याप पुरावे हातात आलेले नाहीत, त्यामुळे अधिक बोलणं योग्य नाही. लष्करात सर्वधर्मसमभाव आहे पण लष्करी अधिकार्‍यालाही धर्म असतो', असं चितळे यावेळी म्हणाले. चर्चेमध्ये निवृत्त मेजर सुधीर सावंत यांनी हा मुद्दा खोडून काढला. सैनिकाला कुठलीही जात नसते. तो फक्त सैनिकच असतो. याप्रकरणी तो अधिकारी दोषी आढळ्यास त्याचं कोर्ट मार्शल केलं पाहिजे, असं सावंत म्हणाले. पत्रकार निरंजन टकले यांनी मालेगाव घटनेत कोर्टासमोर आलेले पुरावे मांडले. याप्रकरणावर सुरू असलेलं राजकारणही त्यांनी सांगितलं. निवृत्त ले.कर्नल चितळे यांनी पुन्हा सांगितलं की लष्करी अधिकारी हा सुद्धा माणूस आहे. त्याला सुद्धा भावना आहेत. ' मालेगाव बॉम्बस्फोटात लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित प्रकरणामुळं लष्कराच्या प्रतिमेला तडा गेलाय का ?' या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 66 टक्के लोकांनी ' हो 'असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, लष्काराच्या प्रतिमेला तडा गेल्यामुळे आपण व्यथित आहोत. या प्रकरणाचं राजकारण व्हायला नको. पुरोहित चुकले असतील तर त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

close