सर्वपक्षीय बैठक हे मराठी नेत्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का ?

November 13, 2008 1:49 PM0 commentsViews: 12

मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाजप पक्ष गैरहजर राहिला. तिकडे बिहारमधील सर्वपक्षीय नेते एकत्र आले. पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात तर सर्वपक्षीय बैठकीबाबतही राजकारण होत आहे. यावरच 'आजचा सवाल ' मध्ये चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय बैठक हे मराठी नेत्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का ? हा चर्चेचा प्रश्न होता. या चर्चेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, काँग्रेस नेते उल्हास पवार आणि पत्रकार हेमंत देसाई सहभागी झाले होते. सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे का ? या आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या प्रश्नावर खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. मराठीच्या मुद्यावर वेळोवेळी सरकारनं बैठका घेतल्या पाहिजे होत्या. या विषयावर पत्रकार हेमंत देसाई यांनी सद्यस्थिती मांडली. ' सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. मराठी खासदार आणि मराठी लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची प्रतिमा पंतप्रधान आणि देशासमोर मांडली पाहिजे. हिंदी मीडियानं महाराष्ट्रात मोगलाई सुरू असल्याचं चित्र निर्माण केलं आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी मराठी नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण या मुद्यावर शिवसेनेची गोंधळलेली स्थिती आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या मराठीच्या मुद्यावर जनसंघानं कधी पांठिबा दिला नव्हता. आताही गोपीनाथ मुंडेची भूमिका अस्पष्ट आहे. सीमा प्रश्न सोडला तर मराठी नेते कधी एकत्र आले नाहीत ',असं देसाई म्हणाले. मराठीच्या मुद्यावर राजकारण सुरू आहे का ? या प्रश्नावर उत्तर देताना उल्हास पवार म्हणाले, महाराष्ट्राची बदनामी ठरवून केली जात आहे. ही बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे पण भाजप आणि शिवसेनेमध्ये या मुद्यावर एकमत नसल्याचं दिसून येत आहे. यावर प्रत्युत्तर देताना खासदार खैरे यांनी सांगितलं की या मुद्यावर राजकारण वैगरे होत नाही. सर्वपक्षीय बैठक हे मराठी नेत्यांना उशिरा सुचलेल शहाणपण आहे का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 98 टक्के लोकांनी ' हो ' असं मत नोंदवलं. मराठीच्या मुद्यावरही राजकारण होत असल्याचं चर्चेत दिसून आलं. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले की सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्यावरही राजकारण होतंय. मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. राजकारण्यांनी एकत्र आलं पाहिजे. परंतू वेळेच्या आधी किंवा वेळेवर. उशिरा येऊन काही होणार नाही.

close