क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशहा ‘ राज कांबळे ‘

November 16, 2008 7:26 AM0 commentsViews: 30

युथ ट्यूबच्या या भागात आपण भेटलो क्रिएटिव्ह अ‍ॅड्सचा बादशहा राज कांबळेला. जे सरळ साध समोर दिसतं त्या सगळ्याला प्रश्न करणे म्हणजेच राज कांबळे असणे. तिशीतला राज कांबळे ' लोव ' या जगप्रसिद्ध अ‍ॅडव्हरटायझिंग एजन्सीचा न्यूयॉर्कमधला क्रिएटीव्ह हेड आहे. राजचं आयुष्य सुरू झालं माझगावमध्ये. माझगावमधल्या सर एलिका दुरिका शाळेत. या शाळेतल्या टिपिकल ज्यूइश कल्चरमध्ये. आजही शाळेतली प्रार्थना हिब्रूमध्ये होते. आपल्या करिअरच्या सुरुवातीविषयी राज म्हणाला, ' माझी चित्रकला पहिल्यापासूनच चांगली होती. फारसा हुशार नसताना मी दहावीत फर्स्ट क्लास मिळवला. मग मी व्हिजेटीआय कॉलेजमध्ये सिव्हिल इंग्जिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. पण मला कॉलेज काही पटलं नाही. आठव्या दिवशी मला कळलं की हा अभ्यास मला नाही करायचा. मी क्रिएटिव्ह माणूस आहे. मी एक अधिक एक दोन नाही करू शकत. मी एक अधिक एक सहा करू करतो. एक अधिक एक अकरा करतो, आणि मग त्यामागच्या लॉजिकचा विचार करतो. मग कोणीतरी सुचवलं की तू जेजेला जा. मग मी जेजेला अ‍ॅडमिशन घेतली आणि मग सगळ्या गोष्टी जमत गेल्या. मी आज जो कोणी आहे, तो जेजेमुळे आहे. ' जाहिरातीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत तुम्हाला तुमचा मुद्दा पोहचवता आला पाहिजे ' इतक्या साध्या भाषेत त्याने जाहिरातींचा अर्थ समजावून सांगितला.' मी जेव्हा या क्षेत्रात आलो, तेव्हा माझं इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं. पण माझ्या याच विकनेसचा मी फायदा करून घेतला. मी अशा जाहिराती बनवल्या ज्यात शब्दच नसावेत. यलो पेजेससाठी मी जी जाहिरात बनवली त्यात मी एक कोरी करकरीत गीता, तसंच बायबल आणि कुराण ठेवलं आणि त्याच्या बाजूला एक खूप वापरलेलं यलो पेजेसचं पुस्तक ठेवलं. म्हणजे इतर कशाहीपेक्षा यलो पेजेस जास्त वापरली जातात, ही कल्पना मी शब्दाशिवाय मांडली. ' डीएनएडी ' हे युकेचं जगप्रसिध्द पारितोषिक मला या जाहिरातीबद्दल मिळालं भारतात पहिल्यांदाच कोणालातरी हे पारितोषिक मिळालं. 'भारतातल्या माणसांना या क्षेत्रात खूप स्कोप आहे, असं सांगत राज म्हणाला, ' भारतात खूप सार्‍या भाषा बोलल्या जातात. सहाजिकच इथे जाहिरात बनवता शब्दांचा कमीत कमी वापर करण्याचं तंत्र इथे वापरलं जातं. हे तंत्र आत्मसात केलं तर गोबल इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. ' राज हा प्रयोगशील माणूस आहे. हवं ते काम करण्यासाठी अर्धी दुनिया भटकून अखेर तो न्यूयॉर्कमध्ये स्थिरावलाय.राजला आयडियाज जगात कुठेही भेटतात. कधी चणेवाल्याकडे, कधी सिनेमा हॉलमध्ये, कधी खाली पडल्यावर, कधी खूप आनंदात असताना तर कधी अगदी सहजच, तर कधी बाथरूममध्ये. म्हणूनच बाथरूमला त्याने नवीन नाव दिलं आहे – ' सोचालय ' ' माझ्या मते आयडिया म्हणजे जगणं. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे पहाता, यावर आयडिया अवलंबून असतात. ' असं त्यानं सांगितलंकित्येक अ‍ॅवॉर्ड्स मिळवलेल्या राजचा या अ‍ॅवॉर्ड्सकडे पहायचा दृष्टीकोनही एकदम हट के आहे. तो म्हणतो ' माझ्या आई-वडिलांना अजूनही नेमकं माहिती नाही की मी नेमकं काय करतो. पण अ‍ॅवॉर्ड्स दाखवल्यावर त्यांना समाधान मिळतं. तसंच अ‍ॅवॉर्ड म्हणजे आपल्या यशाची एक पावती असते. ' माझगाव ते न्यूयॉर्क व्हाया सारं जग असा राज कांबळेचा प्रवास इन्स्पायरिंग आहे. त्याला भेटण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close