तरुणाईची लढाई – दहशतवादाशी

December 6, 2008 2:46 PM0 commentsViews: 3

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानं मुंबई हादरली. देशाच्या या आर्थिक राजधानीला हा जबरदस्त धक्का होता. अर्थात मुंबईवरचा हा काही पहिलाच हल्ला नव्हता. 1993 साली बॉम्बस्फोट झाले, पण ते सूडाच्या भावनेतून झाले आणि ही भावना लवकर ओसरेल असं मानलं. 2006 मध्ये मुंबईच्या लाईफ लाईनला, ट्रेन्सला टार्गेट केलं, पण मुंबई पुन्हा उभी राहिली, धावायला लागली. त्यावेळेस मुंबईच्या 'स्पीरिटचं' कौतुक झालं. पण यावेळेस 26/11 ला जे काही झालं त्याविरुद्ध सगळी तरुणाई पेटून उठली. त्याचंच प्रतिबिंब 3 डिसेंबरला गेट वे ऑफ इंडियाला या दहशतवादाचा निषेध करण्यासाठी झालेल्या रॅलीत उमटलं. आमच्या युथ ट्यूबचे रिपोर्टर्सनी ही तरुणाईची स्पंदनं आयबीएन लोकमतच्या दर्शकांपर्यंत पोचवली.ही रॅली कोणत्याही संघटनेनं किंवा नेत्यानं आयोजित केली नव्हती. केवळ एसएमएसच्या माध्यमातून या रॅलीची माहिती लोकांपर्यंत पोचली आणि त्याला लोकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीतून राजकीय नेते आणि सिस्टिमविरुद्ध तरुणाईची चीड व्यक्त झाली. "तुम्हाला आमचं संरक्षण करता येत नसेल तर आम्हाला बंदुका द्या, आम्ही आमचं रक्षण स्वत: करू" , "हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे", "हा भ्रष्टाचारी यंत्रणेचा आणि कणखर नेतृत्वाच्या अभावाचा परिणाम आहे", "शहीदोंको सलामी दो, नेताओंको गाली दो" अशा अनेक प्रतिक्रिया तरुणाईतून उमटल्या. पण फक्त राजकारण्यांवर राग व्यक्त करून ते थांबले नाहीत. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बहादूर जवानांना या कार्यक्रमात सलाम करण्यात आला. इनफ इज इनफ हे तर मान्य आहे, पण यावर उपाय काय ? याचंही उत्तर इथे जमलेल्या तरुणांनीच दिलं. "आज मला कळलं की मतदान करण किती जरूरी आहे. मी आज इथे निश्चय करतो की मी जबाबदारीनं मतदान करीन. म्हणजे पुढच्या वेळेस अशी घटना घडलीच तर मी फक्त राजकारण्यांना दोष देणार नाही, तर चुकीच्या नेत्यांना निवडल्याबद्दल मी स्वत:ला दोषी समजेन" इथपासून ते "प्रत्येकाने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे", "आमच्याकडे खूप सारे डॉक्ट इंजिनिअर आहेत, पण आम्हाला गरज आहे ती तरुण नेत्याची", "जर सिस्टिम बदलायची असेल तर तुम्हाला सिस्टीमचा भाग बनावं लागेल" इथपर्यंत अनेक प्रतिक्रिया या कार्यमात दिल्या. दहशतवादाची समस्या तर आहेच, पण देशातल्या तरुणाईनं एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा उभारला, तर निश्चितपणे हा प्रश्न सुटू शकतो, हीच आशा या कार्यक्रमात दिसून आली.हा संपूर्ण कार्यक्रम आणि तरुणाईच्या प्रतिक्रिया तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.

close