धुळे दंगलीतील आरोपी बनले नगरसेवक

December 9, 2008 6:41 AM0 commentsViews: 113

9 डिसेंबर, धुळेदीप्ती राऊत, अक्षय छाजेडदोन महिन्यांपूर्वी धुळे शहर भयानक दंगलीत होरपळून निघालं. त्यानंतर झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले. धक्कादायक बाब म्हणजे दंगलीतले साबीर शेख, हिरामण गवळी आणि महेश मिस्त्री हे आरोपी या निवडणुकीत निवडून आलेत. फक्त दंगलच नाही, तर यांच्यावर त्या आधीही बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही पोलीस कोठडीत असून ते मतं मिळवून विजयी झाले आहेत.5 ऑक्टोबरचा दिवस धुळेकरांसाठी भयाण ठरला.. धार्मिक दंगलीनं पेटलेलं धुळं.. 11 ठार, 352 जखमी, 410 वाहनांचं नुकसान, 256 गुन्हे आणि 600 आरोपींना अटक… पण खरं नाट्य त्यानंतरच सुरू झालं. निवडणुकीचा फड रंगला. दंगलीतले हिरो निवडणुकीच्या रिंगणातले हिरे बनले आणि थेट पोलीस कोठडीतून निवडून आले. "धुळे महापालिकेत जे निवडून आलेत साबीर शेख, हिरामण गवळी आणि महेश मिस्त्री यांच्याविरुद्ध दंगलीला चिथावणी देणे, दंगलीत सहभाग घेणे याप्रकारचे गुन्हे दाखल आहेत" धुळ्याचे पोलीस अधिक्षक सुनील कोल्हे यांनी सांगितलं.साबीर शेख काँग्रेसचे असले तरी ते ही निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि निवडून आले. हिरामण गवळी हिंदू जनजागरण समितीचे अध्यक्ष. त्यांना भाजपानं उमेदवारी दिली आणि विजयी झालेत. दंगलीतले तिसरे आरोपी महेश मिस्त्री हे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते देखील निवडून आलेत. फक्त हीच दंगल नाही, तर या तिघांची याआधीचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.मात्र राजकीय पक्षांचं यावर काही वेगळच म्हणणं आहे. "त्यांच्याकडे जनतेची सहानुभूती आहे. ते लोकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर होते. सहानुभूतीमुळे त्यांना विजय प्राप्त झालाय" असं मत शिवसेना नेते आणि माजी महापौर भगवान करनकाळ यांनी दिलं. तर दुसरीकडे " अल्पसंख्यांक समाजाचे लोक विचार करतात आपल्याला त्यांच्यामध्येच राहायचय, तर कशाला त्यांना दुखवा ? या विचारसरणीमुळेच हे लोक जिंकले" असा आरोप शब्बीर मर्चंट या नागरिकानं केला. "धुळ्याच्या दंगलीचा निश्चित फायदा या तिन्ही उमेदवारांना झालाय. मिस्त्री, गवळी आणि भंगारवाला या तिघांना दंगलीमुळे निवडणूक फार सहजतेनं जिंकता आली. गवळी याआधी निवडूनही आले नव्हते तर साब्बीर शेखवर मोठमोठ्या केसेस आहेत" असं शाम पाटील या नागिकानं सांगितलं.निवडून यायचं असेल तर लोकांची कामं करण्याची किंवा वॉर्डाचा विकास करण्याची काहीच गरज नाही. एखादी दंगल घडवून आणली की बास.धुळे महापालिकेच्या निवडणुकीत तेच सूत्र यशस्वी झालयचं स्पष्ट झालंय.

close