गप्पा जिम्नॅस्टिकपटू नीता ताटके यांच्याशी (भाग – 1)

December 17, 2008 6:34 AM0 commentsViews: 24

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये खेळ आणि दैनंदिन जीवन याविषयावर चर्चा झाली. या चर्चेत सुप्रसिद्ध जिम्नॅस्टिकपटू नीता ताटके यांनी मार्गदर्शन केलं. नीता ताटके या व्यवसायाने मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी मानसशास्त्र हा विषय घेउन एम.फील केलंय. रुपारेल कॉलेजमध्ये त्या मानसशास्त्र शिकवतात. याशिवाय श्री.समर्थ व्यायाम मंदिरमध्ये त्या मल्लखांब विभाग प्रमुख आहेत. मल्लखांब, जिम्नॅस्टिक, योगासन यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मेडल्स मिळवली आहेत. मल्लखांबच्या त्या राष्ट्रीय पंच आहेत. जर्मनी, दुबई, अमेरिका , इंग्लंड या देशांमध्ये त्यांनी मल्लखांबचं प्रशिक्षण दिलंय आणि प्रात्यक्षिकही करुन दाखवलंय. सध्या त्या क्रीडा मानसशास्त्रावर संशोधन करत आहेत. खेळाचं जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं नीता ताटके यांचं महत्त्व आहे. त्याविषयी त्या सांगतात, " मुलं खेळायला लागली की, त्यांच्यातली शारीरिक तंदुरुस्ती वाढते. म्हणजे रक्ताभिसरण चांगलं होतं, पचन चांगलं होतं, इम्युन सिस्टीम चांगली राहते. त्यामुळे मुलं आजारी पडत नाहीत. मुलं आजारी पडली नाहीत की शरीरातली उर्जा चांगली राहते. त्यामुळे दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टी मुलांनी करायला हव्यात, ते करण्याची मुलांमधली क्षमता चांगली राहते. मुलं रोजची कामं आनंदानं करू शकतात. जी मुलं खेळतात त्यांच्यात प्रत्येक कामात एक प्रकारचं सातत्य असतं. मला एखादी गोष्ट जमली नाही तर मी ती आता नाही तर नंतर करेन, ते करण्याचा प्रयत्न करेन, अशी मानसिकता मुलांमध्ये तयार व्हायला लागते. खेळाचा उपयोग व्यक्तिमत्त्वविकासासाठी चांगल्याप्रकारे होतो.असं जगभरातल्या संशोधकांचं मत आहे. शेवटी व्यक्तिमत्त्व म्हणजे काय… तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा आत्मविश्वास, एखाद्या परिस्थितीला जर मला तोंड द्यायचं असेल, तर ते देण्यासाठी मी तयार आहे की नाही, ही निर्णय घेताना श्रम घेण्याची तयारी आहे की नाही, अपयशाने खचून न जाता सातत्याने करायची तयारी असे सगळे गुण खेळामुळे आपल्यात येतात ." ' सलाम महाराष्ट्र ' मानसशास्त्राच्या प्राध्यापिका नीता ताटके यांनी खेळाचं दैनंदिन जीवनातलं महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केलं. नीता ताटके यांच्याशी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येतील.

close