अनिस अहमद यांच्यावर तांडेल यांचे आरोप

December 9, 2008 12:14 PM0 commentsViews: 12

9 डिसेंबर, मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अनिस अहमद आणि पोलीस उपायुक्त मधुकर कोहे जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे. सध्या मंत्रिमंडळात असलेल्या अनिस अहमद यांची हकालपट्टी करावी, गुजरातच्या किनार्‍यावर आरडीएक्स उतरवलं जाणार असल्याची माहिती अनिस अहमद यांना दिली होती, अशी माहिती तांडेल यांनी दिली. त्याकडं त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळं हा हल्ला झाला, असा आरोप तांडेल यांनी केला. अनिस अहमद यांच्याकडं आधी सागरी आणि बंदरविकास खातं होतं. मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे गंभीर आरोप केले. गुजरातमधून सुमारे साडे सात हजार मच्छिमार मुंबईला येणार आहे, त्यात अनेक बांग्लादेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मुंबईत घातपाताचे प्रकार घडवले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती आपण 3-4 महिन्यांपूर्वी त्या वेळचे बंदरविकास मंत्री अनिस अहमद आणि पोलीस उपायुक्त मधुकर कोहे यांना दिली होती. त्यासंदर्भात अनिस अहमद यांच्याबरोबर बैठकही झाली होती, मात्र या आरोपाकडे अनिस अहमद यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच मुंबईवरचा दहशतवादी हल्ला यशस्वी झाला, असं तांडेल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यासंदर्भात झालेल्या पत्रव्यवहाराचे पुरावे देखील त्यांनी सादर केले.गुजरातहून मुंबईला सुमारे 950 ट्रॉलर्स येतात. त्यातले केवळ 100 ट्रॉलर्स अधिकृत आहेत. इतर ट्रॉलर्सला वर्षाचे 50 हजार हजार रुपये घेऊन बोगस परवाने दिले जातात, असा आरोपही दामोदर तांडेल यांनी केला. अनिस अहमद यांना परत बमदरविकास खातं दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही तांडेल यांनी दिला आहे.

close