शालोम इस्त्राएल – भाग 2

December 28, 2008 2:47 PM0 commentsViews: 44

अलका धुपकर नियोजित इमारती, मोठमोठे रस्ते, 100 च्या स्पीडनं सतत धावणार्‍या कार आणि सगळीकडे जाणवणारी स्वच्छता ही इस्त्राएलची वैशिषट्यं. ईस्त्राएलची लोकसंख्या आहे जवळपास 80 लाख आणि याचं क्षेत्रफळ आहे 20,770 चौरस किलोमीटर. या देशात उत्तरेकडे डोंगर-दर्‍या आहेत. दक्षिणेकडे नेगेव्हसारखं वाळवंट, तर काही ठिकाणी मैदानी पठारंही. स्वतंत्र झाल्यापासून जगभरातल्या सुमारे 70 देशांमधले ज्यू या देशांत येउन स्थायिक झाले. भारतातल्या इस्त्रायली लोकांना शनवार तेली म्हणून ओळखलं जातं. तसंच भारतातून इस्त्रायलला आलेल्या ज्यूंना इस्त्राईलमध्ये 'होदू' म्हणतात. तर महाराष्ट्रातून इस्त्राईलला गेलेल्या लोकांना म्हणतात 'बेनेइस्त्राएली.' इस्त्राएलमधल्या लूध आणि रामली भागात मराठी कुटुंब खूप आहेत. इथल्या बेडरूम्स मोठ्या असतात. घरं हवेशीर असतात. इथे घरं मीटरमध्ये मोजतात. इथं खजुराची झाडंही खूप आढळतात.माणसं गरीब असली तरी बाथरूम पॉश असतात. सत्तर वर्षांच्या सीमा कांदेलकर मुंबईला राहायच्या. त्यांचे पती सॉलोमन कांदेलकर वयाच्या 55 वर्षापर्यंत एसटीच्या वर्कशॉपमध्ये ठाण्याला काम करायचे. चार मुलांसहीत कांदेलकरांनी भारत सोडला कारण त्यांचे सगळे नातलग इस्त्राएलला आले. पण सुरवातीला त्यांना करमायचंच नाही. "ते रडायचे. तासतासभर रडायचे. सांगायचे की चल मुलांना घेउन परत मुंबईला जाउया. पण कसं जाणार ? तिकडंच सगळं आम्ही विकून आलेलो" असं सीमा कांदेलकर सांगतात. अख्खं आयुष्य ज्यांच्यासोबत घालवलं त्यांच्या आठवणी सॉलोमनना म्हातारपणात सोबत देतात. पवार, सातपुते, अरुण, बेडेकर अशा जुन्या मित्रांची त्यांना फार आठवण येते. सीमा कांदेलकर वर्षातून एकदा मुंबईत येतात. पण सॉलोमन एकदाही मुंबई भेटीवर आले नाहीत. "मुंबईच्या मी इतका प्रेमात आहे, की मुंबईत आलो तर मी परत जाणार नाही. या भीतीपोटी यायचचं टाळतो." असं ते म्हणाले. इतकं बोलतानाही सॉलोमनना रडू कोसळलं. मुंबई म्हणजे त्यांचा वीकपॉईंटच. सॉलोमनची चारही मुलं ईस्त्राएली नागरिक आहेत. तिथल्या युद्धाचे अनुभवही त्यांनी घेतले आहेत. "1992 ला सद्दामचं युद्ध चालू असताना सगळीकडे भrती होती. पोरांना शाळेत लढायचं ट्रेनिंग दिलं जायचं. युद्ध सुरु झालं तर धान्य मिळणार नाही म्हणून दुकानांमध्ये गर्दी व्हायची खरेदीला. कारण लोकांना अंडरग्राउंड व्हावं लागायचं. मग केमिकलची पण भिती होती. त्यामुळे दरवाजे, खिडक्या बंद करावे लागायचे. मास्क लावावे लागायचे. काहीवेळा म्हातारी माणसं घाईत मास्कचा फिल्टर काढायला विसरायचे आणि मरण पावले. हे मी स्वत: पाह्यलय. एअरपोर्टच्या बाजूला बॉम्ब पडताना पाह्यलेत" असं सॅलोमन यांची मुलगी सुजाता मुरकर सांगतात. सुजाताचा भाउ शाहूल आणि त्याची बायको रीना हे राहतात 'पेताह तिखवा' या भागात. डोंबिवली ते इस्त्राएल अशा स्थलांतरानंतर आता ते बनलेत पक्के इस्त्राएली. ज्यू- अरब वादाबद्दल इस्त्राईलच्या या नागरिकांचा अनुभव थोडा वेगळा आहे. "आम्ही जिथं काम करतो तिकडे पोलंड, रशिया, युरोप सगळीकडचे लोक आहेत, अरब पण आहेत. आम्ही सगळे एकत्र असतो. कधी भीती नसते की असं काय वेगळं नाय वाटतं" असं रीना कांदेलकर सांगतात. रीनाकडेच आम्हाला भेटल्या प्रिया निंबाळकर, त्यांची बहीण क्लारा आणि क्लाराचा नवरा शोफेर जोसेफ. मूळचा मुंबईचा असलेला हा परिवार आता अक्षरश: ग्लोबल झालाय. "माझी चार मुलं. पहिल्याची बायको इंडियन, दुसर्‍या मुलीचा नवरा इंडियन, तिसरी सून तैमानी आणि चौथी ओसे म्हणतात ना काय ते म्हणजे इराकी सून." असं क्लारा जोसेफ सांगतात. आपली मूलं पण मराठी बोलतील असा विश्वास क्लारा यांना आहे. भारतातून इस्त्राएलमध्ये आलेल्या या सगळ्यांसाठी भारतासोबतचं नातं एवढ्या वर्षानंतर नक्की काय आहे ? "भारत म्हणजे आमची आई आहे आणि ईस्त्राईल म्हणजे मावशी" असं प्रिया निंबाळकर सांगतात. असाच आणखी एक होदूआम्हाला भेटला तो म्हणजे आमचा टॅक्सी ड्रायव्हर. सफाईदार हिब्रू आणि इंग्रजी बोलणारा आणि नेहमी हिंदी गाणी ऐकणारा. त्याचं नाव अ‍ॅली सामटकर. "मी 8 वर्षाचा असताना इकडे आलो. माझ्या आई-वडिलांना इकडे काम मिळालं. मला हिंदी आवडतं पण डिस्को नाही. शांत गाणी" असं अ‍ॅलीनं सांगितलं.

शालोम इस्त्राएल भाग – 3 पहाण्यासाठी येथे क्लिक करा

http://www.ibnlokmat.tv/programdetails.php?id=34011&channelid=261

close