दहशतवादाच्या छायेखाली (भाग : 2)

January 2, 2009 12:02 PM0 commentsViews: 17

मुंबईवरचा दहशतवादी हल्ला सगळ्या वृत्तवाहिन्यांवरून दाखवला गेला. हा दहशतवादी हल्ला अनेक जणांनी पाहिला. त्या अनेक जणांमध्ये बच्चे कंपनीही होती. दहशतवादी म्हणजे काय , ते कुठून येतात , त्यांच्या हातात बंदुकी का असतात , या बंदुकींचा वापर ते कसे करतात , या बंदुका हातात घेऊन ते काय करणार आहेत, असे अनेक प्रश्न ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांनी पालकांना विचारले असतील. आणि पालकांना त्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देताना नाकीनऊ आले असतील. किंवा मुलांनी पालकांकडे दहशतवाद्यांना मारण्यासाठी बंदूक मागितली असेल. त्यावेळी ती द्यावी की नाही अशा द्विधा मन:स्थितीत पालक असावेत. याचाच अर्थ मुलं अजूनही दहशतीच्या छायेखाली आहेत. त्यांच्या मनाची पकड दहशतवाद सोडत नाहीये… मुलांना त्या मन:स्थितीतून बाहेर कसं काढावं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत याचं मार्गदर्शन ' टॉक टाइम 'मध्ये करण्यात आलं. जे. जे. हॉस्पिटलचे माजी डीन डॉ. बी. एम. सबनीस यांनी या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे. डॉ. सबनीस यांनी दहशतवाद आणि मुलांची मानसिकता याचा अभ्यास केला आहे. दहशतवादाचा अनुभव जी लहानमुलं जवळून अनुभवतात त्यांना त्या प्रसंगातून बाहेर काढणं कढीण असतं. पण डॉक्टर बी.एम. सबनीस यांनी ते लिलया साधलं आहे. डॉ. सबनीस सांगतात, " घातपाती कारवायांमध्ये आई-वडिलांना गमावून बसलेला अफरोज नावाचा मुलगा जे. जे. मध्ये दाखल झाला होता. सतत चार दिवस तो रडत होता. कुणाशी काही बोलन नव्हता. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. आपल्या आईवडिलांना गमावल्याचं दु:ख त्याच्या कृतीतून मला दिसत होतं. पण तो कुणाशीच काही बोलत नव्हता. लहान मुलं ही शार्प असतात. ते कोणतीही गोष्ट चटकन शिकतात. अफरोजला त्या परिस्थितीतून मी बाहेर काढायचं ठरवलं. त्याला ज्या वॉर्डात ठेवलं होतं त्या वॉर्डातल्या रुग्णांना मी त्याच्याशी बोलायला सांगितलं.त्याप्रमाणे ते रुग्ण वागायचे. हळुहळु अफरोज माणसाळायला लागला. त्याची आणि माझी छान मैत्री झाली. तो त्या धक्क्यातून सावरला होता. पूर्ण बरा झाल्यावर मी त्याच्याकडे त्याच्या आईवडिलांचा विषय काढला. तसा त्यानं मला त्याचे आईबाबा हयात नसल्याची त्याला कल्पना असल्याचं सांगितलं. पण हे दु:ख त्याला मी आणि त्याचे हॉस्पिटलमधले मित्र विसरायला मदत करणार आहेत." डॉक्टरांचा हा अनुभव हा बरंच काही सांगून आणि शिकवून गेला आहे. दहशतवादी म्हणजे काय , ते कुठून येतात , त्यांच्या हातात बंदुकी का असतात , या बंदुकींचा वापर ते कसे करतात , या बंदुका हातात घेऊन ते काय करणार आहेत यांसारखे अनेक प्रश्न विचारतात तेव्हा पालकांनी भंजाळून जायचं नाही. विषयांतर करायचं नाही तर त्यांना सकारात्मक पद्धतीनं, साध्यासोप्या भाषेत घडलेल्या परिस्थितीची कल्पना करून द्यायची, असा मोलाचा सल्ला देत डॉक्टर म्हणले, " अशावेळी मुलांना शिवाजी महाराज, रामयण, महाभारतातल्या वीरांच्या कथा सांगून वाईट प्रवृत्तींवर कसा विजय मिळवायचा, याचं महत्त्व सांगयाचं. मुलांपासून कोणतीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते." डॉ. बी. एम. सबनीस यांनी टॉक टाइम ' मध्ये केलेलं मार्गदर्शन पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close