हिरव्यागार गावाची गोष्ट (भाग : 1 )

January 5, 2009 4:17 AM0 commentsViews: 215

हिवरे बाजार. अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेकडे नगर तालुक्यात हिवरेबाजार गाव आहे. खरंतर अहमदनगरच्या या भागात पाऊस कमी पडतो. तरीही हिवरे बाजारात सुबत्ता असते. कारण इथल्या लोकांनी पोटापाण्याचा प्रश्न पाण्याचा वापर करूनच सोडवला गेला आहे. हिवरेबाजारात प्रवेश केल्यावर गवातलं सुख आपल्याला दिसू लागतं. 1990 नंतर हिवरे बाजार गावाचे दिवस ख-या अर्थानं पालटले. त्या आधी गावात अशी परिस्थिती नव्हती. हिवरे बाजार हे गाव इतिहासात प्रसिद्ध होतं. हिवरेबाजारचे संदर्भ आपल्याला इतिहासतही सापडतात. पेशवेकालीन खाणाखुणा गावाने आजही जपल्यायत. पण त्याहीआधी गाव प्रसिद्ध होतं ते घोड्यांच्या बाजारासाठी. या गावाची गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होते. महाराजांच्या अखत्यारित असणा-या जुन्नर परगाणा भागाचं शेवटचं गाव म्हणजे हिवरे गाव. गावात पूर्वी प्राण्यांचा बाजार भरायचा. घोडे आणि हत्तींची खरेदी व्हायची. शिवाय गावाला लागूनच निजाम साम्राज्य होतं. हिवरेबाजारात तेव्हा दूधदुभतं होतं. त्यामुळे इथे पट्टीचे पहेलवान तयार होऊ लागले. इथल्या मातीत कुस्तीचा बाजार रुजू लागला. पण 72 च्या दुष्काळात हिवरेबाजारचा हिरवागार चेहरा हरवू लागला. आणि गावक-यांच्या वाट्याला आलं ते स्थलांतर आणि तेही शहरांकडे. 72च्या दुष्काळानंतर ज्वारी आणि बाजरी हीच गावातली मुख्य पिकं होती. 95 टक्के लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. गावात पावसाचं प्रमाण 200 ते 400 मि.मी होतं. गावातले लोक 4 महिन्यांसाठी स्थलांतर करू लागले. गावात सावकाराचं राज्य आलं. कालांतरानं दुधाची जागा दारुनं घेतली. दारुनं गावात धिंगाणा आणि मारामा-या आणल्या. दारूमुळे गावात चो-या होऊ लागल्या. अशा हिवरेबाजारचा चेहरामोहरा बदलला तो या गावचे पोपटराव पाटील यांच्यामुळे. क्रिकेटची आवड असणारे पोपटराव मैदान गाजवत होते. जिल्ह्यापासून देशपातळीपर्यंत जिद्दीने ते जिद्दीनं खेळत होते. 1989ला पोपटराव पाटलांनी सरपंचाची निवडणूक जिंकून खरा मास्टरस्ट्रोक मारला. क्रिकेटर होण्याचं त्यांचं स्वप्नं मागं पडलं. आणि दुष्काळावर मात करण्याचा ध्यास सुरू झाला. या चित्रातून आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे या इच्छेनं त्यांनी पुढच्या प्रवासाच्या दिशेनं सुरुवात केली. त्या प्रवासातून गावातल्या गरजा समोर आल्या. त्यांचं कागदावर नियोजन केलं. 90 ते 95 ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला. पण गावाला हवी असलेली पिकं, पिण्यासाठी पाणी आणि शेतीतून रोजगार कुठून मिळणार? याला उत्तर होतं. जलसंधारण, मग जलसंधारणाचं नियोजन करून गावात पहिलं पाणी आणलं. समपातळीवर चर, कुरण विकास, रोजगारही मिळाला पाणीही मिळालं. आणि गवत आल्यामुळे सगळं चित्र बदलंलं हिवरेबाजारचा चेहरामोहरा बदलला. शेतकरी अमृता बापू सांगतात, " हिवरे बाजार मध्ये पूर्वी असं नव्हतं. विहरींना पाणी कमी होतं. पाऊस झाला की ते आपोआप वाहून जायचं. थांबत नव्हतं ज्वारी, गहू आणि हरभरा अशी पिकं घेतली जायची. जास्त पिकं घेतली जायचीच नाहीत. " पण आता मात्र हिवरे बाजाराचा कायापालट झाला आहे. इथली कोरडवाहू शेती बागायती झालीये. पण मजुरांचा तुटवडा भासत आहे. बाहेरच्या गावातून इथे कसण्यासाठी लोक येत आहेत.

close