‘तें’ च्या आठवणी

January 7, 2009 3:01 PM0 commentsViews: 61

2008 मध्ये मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी साहित्य याची सर्वाधिक हानी जर कुठल्या गोष्टीमुळे झाली असेल, तर ती नाटककार विजय तेंडुलकर यांच्या निधनामुळे. ही हानी भरून न निघणारी आहे. आपल्या लेखनातून माणूस उलगडून दाखवणारा हा माणूस आज आपल्यात नाही. पण त्यांचं लेखन मात्र आपल्याला सदैव साथ देणारं असंच आहे. काल विजय तेंडुलकर यांचा जन्मदिवस होता.या निमित्ताने त्यांच्या साहित्याविषयी, त्यांच्या आठवणींविषयी बोलण्यासाठी सलाम महाराष्ट्रमध्ये लेखक राजन खान यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तेंडुलकरांच्या आठवणींना सलाम महाराष्ट्रमध्ये उजाळा मिळाला.तेंडुलकरांविषयी बोलताना राजन खान म्हणाले "लेखक म्हणून त्यांची उंची फारच मोठी आहे. पण तेंडुलकर मला खर्‍याखुर्‍या माणसासारखे दिसले. नाव मोठं होत जातं तसं लेखक माणूसपणापासून दूर जातो, पण तेंडुलकरांमधलं हे माणूसपण कायम जाणवत राहिलं. तेंडुलकरांच्या साहित्यातही माणूस कायम सापडत राहिला. माणूस आहे तसा मांडण्याचा त्यांचा ध्यास त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहिला. पण हा माणूस उलगडताना ते कायम तटस्थ राहिले."तेंडुलकरांच्या नाटकांविषयी बोलताना राजन खान म्हणाल "त्यांच्या नाटकातल्या संवादात नाट्य होते, पण ते तितकेच सहज आणि नैसर्गिक होते. मला असं वाटतं की ते नाटक केवळ लिहित नसत, तर नाटक जगत असत. त्यांची नाट्य ही आपल्या जीवनातली वाटायची. सखाराम बाईंडरसारखं नाटकही आपल्याला अवास्तव वाटत नाही. तेंडुलकरांच्या नाटकातून हिंसा समोर आली पण माझ्या मते त्याला करुणेचीही बाजू होती. माझ्या मते रंगमंचं ढवळून काढणारे ते लेखक होते. त्यांनी केवळ मराठी नाही तर जागतिक रंगभूमीला त्यांनी अमूल्य ठेवा दिला आहे. सिनेमाच्या पटकथाही तेंडुलकरांनी लिहिल्या. पण माझ्या मते तेंडुलकर हे एकमेव असे पटकथालेखक होते, ज्यांनी कायम आपल्या पद्धतीच्या गोष्टी लिहिल्या. त्यांना जे म्हणायचं आहे, तेच ते लिहित राहिले. कोणत्याही माध्यमासाठी त्यांनी आपल्या लेखनाशी तडजोड केली नाही. प्रेक्षकांना खेचण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांनी तडजोडी केल्या नाहीत. आणि एवढं सगळं करूनही त्यांचे चित्रपट प्रचंड यशस्वी झाले. याचाच अर्थ त्यांची या माध्यमावर जबरदस्त पकड होती. "घशीराम कोतवाल या तेंडुलकरांच्या नाटकाच्या निर्मितीपासून वाद झाले होते. या नाटकानं एका नव्या बंडखोरीला जन्म दिला. या नाटकानं अक्षरश: वादळ उठवलं. त्याविषयी बोलताना राजन खान म्हणाले "मला हा बंडखोरी शब्द मान्य नाही. ही इतरांच्या दृष्टीने बंडखोरी असेल, पण तेंडुलकरांसाठी ही सहज साधी गोष्ट होती. किंबहुना या नाटकाच्या संपूर्ण टीमच्या दृष्टीने ही बंडखोरी नव्हती. पण आजपर्यंतच्या मराठी नाटकापेक्षा हे नाटक वेगळं होतं. राजकारण, समाजकारण, जातीयता अशा असंख्य मुद्द्यांना स्पर्श करणारं हे नाटक होतं."वैयक्तिक आयुष्यातही राजन खान आणि तेंडुलकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "गेल्या 30-40 वर्षांतले जवळपास सगळेच लेखक लहानपणापासून तेंडुलकरांना लेखक म्हणून ओळखतो. कोणताही नवीन लेखक जुन्या लेखकांचा उगाचच तिरस्कार करतो. तसाच मी पण तेंडुलकरांचा केलेला आहे. पण एकदा माझं लेखन वाचून त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस देखील नवीन लेखकांवर ताबा मिळवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे, असं मला वाटलं. पण जेव्हा त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा मी अक्षरश: त्यांच्या प्रेमात पडलो. मला ते कायम बापासारखे भासले."

close