नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ?

January 16, 2009 10:49 AM0 commentsViews: 5

गुजरातमध्ये नुकतीच गुंतवणुकदारांची परिषद झाली. बडेबडे उद्योगपती जसं की अनिल अंबानी, सुनील मित्तल यांची या परिषदेतला उपस्थिती होती. त्या परिषदेत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली गेली. या परिषदेमुळे नरेंद मोदी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नरेंद्र मोदीमध्ये देशाचं नेतृत्त्व करण्याचे गुण आहेत, असं या परिषदेमध्ये अनील अंबानी आणि सुनील मित्तल यांनी सांगितलं. यावरच ' आजचा सवाल ' आधारित होता – नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ? मोदींनी अशी काय जादू केलीय की ज्याच्यामुळे गुजरातच्या दंगलीचा त्यांच्यावर ठपका असूनही त्यांना देशाचं नेतृत्त्व सोपवावंसं का वाटतं ? मोदींमध्ये खरोखरच देशाचं नेतृत्त्व करण्याचे गुण आहेत का ? मोदींमध्ये असा काय गुण आहे की ज्याच्यामुळे त्यांच्यावरचा गुजरात दंगलीचा कलंक धुतला जाऊ शकतो ? गुजरातमध्ये मोदींची जी स्तुती केली जातेय ती खरी आहे का ? की भांडवलदारांना काय फायदे मिळावेत म्हणून ते मोदींची स्तुती करत आहेत? या सगळ्या प्रश्नांचा आढावा 'आजचा सवाल 'मध्ये घेण्यात आला. या चर्चेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उद्योजक तसंच लेखक पंकज कुरूलकर, व्हय मी सावित्री बाई या गाजलेल्या नाटकाच्या लेखिका सुषमा देशपांडे या नामवंत पाहुण्याचा समावेश होता. " मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर त्याचा फायदा केवळ भारतातल्याच नाही तर देशातल्या उद्योजकांना होणार आहे. पण त्यासाठी मोदींना स्वत:चा धर्मांधपणा बाजुला ठेवावा लागणार आहे, "असं मत लेखक – उद्योजक पंकज कुरुलकर यांनी चर्चेत व्यक्त केलं. " मोदींवर नरभक्ष्यकाचा ठपका समाजातले काही लोक करतात तो चुकीचा आहे. मोदींची कार्यक्षमता ही खूप चांगली आहे. त्यामुळं मला वाटतं की मोदींची पंतप्रधान बनण्यास काहीच हरकत नाही, "अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. " मोदी पंतप्रधान होण्यास पात्र नाहीयेत, ' हे मत हुसेन दलवाई यांचं पडलं. तर " मोदींची पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यांचं प्रशासन कार्यक्षम आहे. या कार्यक्षम प्रशासनचा एक भाग म्हणजे त्यांनी गुजरातमध्ये दंगली घडवून आाणल्यात , " असं सुषमा देशपांडे म्हणाल्या. नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ? या ' आजचा सवाल ' वर 68 टक्के लोकांनी होय असा कौल दिला. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले, " मोदींनी गुजरातमध्ये औद्योगिक विकास केला आहे हे आपण नाकारू शकत नाही. तर दुस-या बाजुला मोदींवर जो गुजरातमधल्या दंगलीतल्या नरसंहाराचा आरोप आहे, तो विसरू शकत नाही. उद्योगपती जेव्हा एखाद्या माणसाची स्तुती करतात ते किती गंभीरपणं घ्यायला हवं हे लोकांनी ठरवायला हवं. त्यामुळे मोदींचं शेवटी काय करायचं ते जनता करणार आहे. "

close