परतफेड कर्जाची ( भाग 2 )

January 19, 2009 7:02 PM0 commentsViews: 4

परतफेड कर्जाचीश्रीमंत व्हा ! या आमच्या कार्यक्रमात आम्ही नेहमीच आपल्यासारख्या सर्वानांच पडणा-या छोट्या तरीही महत्त्वाच्या अशा आर्थिक प्रश्नांचा वेध घेतो. यावेळचा विषय होता कर्जाची वेळेवर परतफेड कशी करावी आणि त्याचबरोबर उत्पन्न आणि कर्जापायी जाणा-या या पैशांचा ताळमेळ कसा बसवावा. फायनानशिअल प्लॅनर अर्चना भिंगार्डे यांनी या विषयाची माहिती दिली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. आर्थिक मंदीमुळे नोक-या जात आहेत. पगार कमी होत आहेत. उत्पन्नातील पैसा पुरत नाही. अशा वेळी खर्चाकरिता कर्ज घेतली जातात. कर्जाखाली आपला हात अडकलेला असताना अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा सध्याच्या काळातला सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक प्रेक्षकांनांही याचंच उत्तर हवं होतं. त्यावर बोलताना प्लॅनर अर्चना भिंगार्डे यांनी नेहमीच आपल्याजवळ संकटसमयी उपयोगी पडेल इतकी मोठी रक्कम असलीच पाहिजे असं सांगितलं. बचती आधी शक्यतो घेतलेली कर्ज आधी फेडून आपल्या बँक खात्यावरचं आणि पर्यायानं मनावरचंही ओझं कमी करावं असं सांगितलं. कर्ज फेडतानादेखील कोणती कर्ज कोणत्या क्रमानं फेडावी याची क्रमवारी लावावी असं तज्ज्ञांनी सुचवलं. महिन्याचा जमाखर्च मांडतानाच आपलं उत्पन्न आणि कर्जासाठी जाणारी रक्कम याची टक्केवारी जरूर काढावी असंही अर्चना यांनी सांगितलं. अनावश्यक खर्च टाळावेत तसंच कर्ज काढून परदेशसहली सारखे खर्चही टाळावेत असंही त्या म्हणाल्या. कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणं अर्थातच कोणत्याही प्रकारे चांगलं नाही मात्र ज्या कर्जाच्या मदतीतून भविष्यात फायदा होणार असेल तर असं कर्ज घेण्यात काहीच हरकत नाही असाच तज्ज्ञांचा सूर होता. एकूणच दर महिन्याला येणारं पगाराचं पाकिट चारीवाटांनी रिकामं होण्याआधी कर्जावर खर्च होणा-या हिश्श्याचंही नियोजन हे तितकंच महत्त्वाचं हे या भागात आपल्याला समजावून घेता आलं.

close