सत्यम मोठ्ठम खोट्टम (भाग- 1)

January 21, 2009 3:34 PM0 commentsViews: 15

सत्यम मोठ्ठम खोट्टम (भाग- 1)सत्यम शब्दाचा संस्कृत अर्थ सत्य. पण जे सत्य बाहेर पडलं त्यानं सगळ्यांना हादरवलं.सत्यमचं संचालक मंडळ आणि सेबीला पत्र लिहून सत्यमचे संस्थापक आणि अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आर्थिक घोटाळा केल्याचं मान्य केलं. आणि 7136 कोटींचा आतापर्यंतचा भारतातला सगळ्यात मोठा कॉर्पोरेट घोटाळा बाहेर आला.सत्यम हे सगळं गौडबंगाल बाहेर यायला लागलं ते मेटास प्रकरणातून. रामलिंग राजूंची मुलं चालवत असलेल्या मेटास प्रॉपर्टीज आणि मेटास इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्या टेकओव्हर करण्याचा राजूंचा प्रयत्न शेअरधारकांनी हाणून पाडला. तर सत्यमने डेटा चोरल्याचा आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत जागतिक बँकेने सत्यमवर बंदी घातली आणि सत्यमच्या उधळलेल्या वारूला लगाम बसला.रामलिंग राजू यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. विजयवाडामधून कॉमर्समध्ये डिग्री घेतल्यानंतर त्यांनी ओहायो युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं. 1977 मध्ये त्यांनी एक स्पिनिंग मिल सुरू केली आणि सोबतच कंन्स्ट्रक्शन बिझनेस.80च्या दशकात आय.टी.च्या उदयाला सुरुवात होत होती. सत्यमचा जन्म झाला 1987 साली. आय.टी. बिझनेसमधून मिळालेला प्रॉफिट त्यांनी जमिनीत गुंतवायला सुरुवात केली. आणि 1988 मध्ये मेटास सुरू झाली.मेटास इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेटास प्रॉपर्टी तब्बल 1.6 अब्ज डॉलर्सना टेकओव्हर करण्याचा राजूंचा बेत होता. यामुळे सत्यमच्या शेअरधारकांचे आय.टी. साठीचे तब्बल 6000 कोटी रुपये राजू बंधूच्या जमिनीमध्ये आणि पर्यायाने खिशात गेले असते. कारण मेटासवर त्यांचीच मालकी होती. पण सध्याच्या मंदीत रिअल इस्टेट क्षेत्राची झालेली वाताहत शेअरधारकांनी पाहिली होती. म्हणून या सौद्याला तीव्र विरोध झाला. 16 डिसेंबरला दुपारी 2 च्या सुमारास या सौद्याचा मनसुबा जाहीर करणा-या राजूंनी दुस-या दिवशीच्या दोन वाजेपर्यंत सौदा मागेही घेतला. यासगळ्यामुळे सत्यमच्या स्टॉकला घरघर लागली. शेअर घसरत चालल्यामुळे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी आपले शेअर विकायला सुरुवात केली. सत्यमचं असं होणं याला वेगळं महत्त्व असल्याचं मत आय.टी. तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलंय. कारण सत्यम ही तुलनेने मोठी कंपनी होती.खरंतर राजूंच्या कामाच्या पद्धतीविषयी सगळ्यात आधी शंका व्यक्त केली होती ती मेट्रो रेलचे कन्सलटंट इ. श्रीधरन यांनी. हैद्राबादमधल्या मेट्रो रेलचं 12 हजार कोटींचं काम मेटासला मिळालं. हे काम चुकीच्या पद्धतीने मिळवण्यात आला असून मेटास हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचा निषेध श्रीधरन यांनी व्यक्त केला होता.आंध्र प्रदेश सरकारने मेटासला गरजेपेक्षा जास्त जमीन दिल्याचंही श्रीधरन यांचं म्हणणं होतं. गेल्या सप्टेंबरमध्ये श्रीधरन यांनी प्लानिंग कमिशनचे अध्यक्ष माँटेक सिंग अहलुवालिया यांना पत्रही लिहिलं. पण यामुळे श्रीधरन यांच्यावर मानहानीचा दावा करण्याची धमकी देण्यात आली. आणि शेवटी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन या प्रोजेक्टमधून बाहेर पडली.आता मेटास हा प्रकल्प पूर्ण करू शकेल का याची आंध्र सरकार पाहणी करतंय.रामलिंग राजू यांनी स्वतःच मान्य केल्याप्रमाणे त्यांच्या मालकीच्या मेटास प्रॉपर्टीजकडे तब्बल 6800 एकर जमीन आहे. ही सगळी जमीन आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबाद आणि विशाखापट्टणम सारख्या मोठ्या शहरांत आहे. यात हैद्राबादमधले तीन आय.टी., एसईझेड आणि मछलीपट्टणमधल्या बंदराजवळची जमीन आहे. आणि याच जमिनीपासून सुरू झाला तो आर्थिक फेरफार करण्याचा सिलसिला.

close