आनंदपर्व (भाग 1)

February 8, 2009 3:37 PM0 commentsViews: 55

आनंदपर्व (भाग 1)

9 फेब्रुवारी 2008, बाबा गेले… माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी धडपडणारा एक माणूस गेला. बाबा आमटे. कुष्ठरोग्याला सन्मानाने जगायला शिकवणारे. भारत जोडो आणि नर्मदा बचाव आंदोलनातले हाडाचे कार्यकर्ते. म्हटलं तर कार्यकर्ते पण खरे नेते. इतरांच्या आयुष्यात आनंदवनच्या रुपाने नंदनवन फुलवणारे. बाबांना जाऊन एक वर्ष पूर्ण होतंय.महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात वरोड्यापासून 3 किलोमीटरवर कष्टाने आणि मोठ्या हिंमतीने आनंदवन उभं राहिलं. सधन जमिनदारांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुरलीधर देवीदास आमटेंनी महारोग्यांसाठी काम सुरू केलं. आणि ते सगळ्यांचे बाबा झाले.1949 मध्ये राज्यसरकारकडून महारोगी सेवा समितीला 50 एकर खडकाळ जमीन मिळाली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसाठी बाबांनी एक स्वप्न पाहिलं.बाबांनी इतरांच्या मदतीने इथली जमीन सुफलाम केली. सुरुवातीला आनंदवनासाठी राबणारे चार हात हळूहळू जोडत गेले आणि आज इथे चार हजारांहून अधिक हात राबतात. शेतीपासून व्यवसायापर्यंत इथे सगळेजण एकत्रपणे काम करतात. पण इथे आलेल्या प्रत्येकाचे बाहेरच्या जगाबद्दलचे अनुभव सारखेच आहेत.इथे येऊन आज तीस वर्ष झाली . आनंदवनात असं काय होतं कि ज्याने येणा-या प्रत्येकाला जगण्याचं बळं दिलं. याबाबत आनंदवनमधले शरदचंद्र सांगतात, बाहेर तिरस्काराची भावना होती. बसमध्ये गेलो की लोक बसायला जागा द्यायचे नाहीत. रमेश आमरू सांगतात, समाजात खूप झेलावं लागलं. घरी लग्नाची बहीण होती. तिच्या लग्नाला त्रास खूप झाला. या कुष्टरोगामुळे लग्न जमलं नाही. मग मी घर सोडलं आणि इथे आलो. बाहेर औषध हाती. पण ते सूट होत नव्हतं. इथे ठिक झालो. इथे विकासभाऊमुळे औषध मिळालंआता बरं वाटू लागलं. इथे आल्यानंतर सगळे भाऊ बहिणी सारखे होते. हळू हळू रमू लागलो. आता तर इथेच राहवंस वाटत परत जाण्याची इच्छा होत नाही.परत जाऊ नये म्हणून याच इच्छेमुळे परत न गेलेले अनेकजण आनंदवनात भेटतील. भद्रावतीचे नारायण मरसकोल्हे इथे आले तेव्हा त्यांचं वय होतं 16 वर्ष. त्यावेळी आनंदवनात फक्त 6 कुष्टरोगी होते.कुष्ठरोग्यांची संख्या वाढत गेली. बाबांच्या मते आनंदवन हे केवळ कुष्ठरोगावर उपचार करणारं केंद्र नव्हतं. तर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं केंद्र होतंएक परिपूर्ण नागरिक म्हणून समाजाने आपल्याला आपले हक्क दिले पाहिजेत. यासाठी सर्व कुष्ठरोग्यांनी लढा दिला पाहिजे म्हणून बाबांनीच त्यांचं मन वळवलं. समाजाने महारोगी म्हणून वाळीत टाकलेल्यांसाठी आनंदवनात जागा होती.मुख्यध्यापक सुधाकर कडू सांगतात, बाहेरच्या जगात गेलं की फरक कळतो. तुलना होते. बाहेर मंदिराबाहेर बसलेले लोक दिसतात. त्यात अंध, मूकबधीर, अपंग कुष्टरोगी असतात. ते दृश्य आमटे परिवाराला नको होतं. इथला नारा होता श्रम श्रीराम हमारा.दया आणि दानधर्म न करता कुष्ठरोगावर मात करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं यावरच आनंदवनमध्ये भर दिला गेला. म्हणूनच- कोणत्याही प्रकारचं मशीद नाही, गिरीजाघर नाही, पुतळे नाहीत. शिवाय इथे जातीपातीच्या भिंती नाहीत की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. स्वच्छता करायला वेगळे लोक नाहीत पण त्यांचे रस्ते मातीचे का असेनात पण स्वच्छ आहेत. त्यांची स्वच्छता तेच करतात यासाठी आनंदवनात स्वच्छतेचे कोणतेही वर्ग भरवले जात नाहीत.भारतीताई आमटे सांगतात, अशिक्षित कार्यकर्ता असो की सुशिक्षित. स्वच्छतेचे धडे तो इतक्या लवकर कसे आत्मसात करतो याचं मलाही आर्श्चय वाटतं. हे इथल्या हवेतले, पाण्यातले गुण असावेत. उदा स्वच्छता जो दिसेल ते स्वच्छ करुन टाकतो. दोन पानं पडलेली सहन होत नाही. हा बदल इथे आल्यावर झाला. बाबांनंतरच्या आनंदवनात क्षणोक्षणी इथल्या माणसांमध्ये तुम्हाला जाणवत राहतो कमालीचा आत्मविश्वास.मुख्यध्यापक सुधाकर कडू सांगतात, बाबांनी आत्मविश्वास दिला. काम करण्याची प्रेरणा दिली. आपली जी वेदना होती ती विसरलं पाहीजे, ही शिकवण दिली आणि इतरांच्या वेदनेशी समरस होता आलं पाहिजे. म्हणूनच इथे आजूबाजूला अंधार असताना डोळस जगाची प्रयोगशाळा उभी राहीली.कडू सांगतात, आज अंधशाळा कोणी बांधली, मूक-बधीर शाळा. कुष्ठरोग्यांनी बांधली. आनंदनिकेतन, महाविद्यालय कोणी बांधली तर कुष्टरोग्यांनी. जगामध्ये हे उदाहरण कुठे सापडणार नाही.

close