आनंदपर्व (भाग 3)

February 8, 2009 2:38 PM0 commentsViews: 49

आनंदपर्व (भाग 3)आनंदवनात अनेकजण आले. आले ते इथलेच होऊन गेले. आणि इथून जे परत गेले ते प्रेरणा घेऊन गेले.इथे राहिले. ते केवळ समाजाच्या मुख्य प्रवाहाने झिडकारलेले नव्हते. तर त्यांनी स्वत:हून बाहेरच्या संधी नाकारून आनंदवन निवडलं. या सगळ्यांचा इथल्या उभारणीत मोठा वाटा आहे. त्यामुळे बाबा आमटे गेल्यानंतरही काम सुरु राहतं.कौस्तुभ आमटे सांगतात, हे काही बाबा आमटे प्रायव्हेट ट्रस्ट नाहीत. आमटे आहेत म्हणून हे चालत नाही तर हे अनेकजणांनी केलेलं काम आहे. केवळ आमटे परिवाराने नाही. काळ बदलतोय तशी नवी नवी आव्हानं येत आहेत. ती पेलण्यासाठी तरुण पिढीकडून खूप अपेक्षा आहेत.भारतीताई सांगतात, बाबांची भिस्त ही तरुणांवर होती. हा देश तेच घडवतील असं ते म्हणायचे. कार्यकर्ते तयार करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिर घ्यायला हवीत. संपूर्ण महाराष्ट्रात अशी शिबीर घ्यावीत कारण गांधीजी म्हणायचे की कार्यकर्ते घडवण्याचं महाराष्ट्र प्रसिद्ध आहे.पल्लवी आमटे सांगतात, सगळे एकाच ध्येयासाठी काम करत असतात. सगळे मातीत हात घालूनच काम करत असतात. हे सगळं येणा-या पिढयांसाठी. इथे जुन्यांचं आणि नव्यांचं नातंही खूप जिव्हाळ्याचं आहे. आणि जुने अजूनही मनाने तरुण असल्यासारखेच आहेत. अजूनही कुष्ठरोगावर बरंच काम बाकी आहे. आजही कोणत्याही रोगाबद्दल किंवा अपंगत्वाबद्दल समाजाचा दृष्टीकोन चांगला नाही. अशा सगळ्या अनुभवांसकट आनंदवन चालतंय माणूसपणाच्या वाटेवर. बाबा गेले तरीही काम सुरू राहीलच पाहिजे हे सगळ्यांनी प्रत्यक्षात आणलंय. कधीही न संपणारं असं हे आनंदपर्व. बाबा गेले असं वाटत नाही. त्यांनी सांगितलं होतं की मी गेल्यानंतर काम सुरू राहीलं पाहिजे. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. बाबांचं मुक्तचिंतन या रस्त्याच्या दुतर्फा असणा-या जंगलाकडे बघ जरा. या इथेच माझे सगळे मित्र पहुडले आहेत. माझ्या मृतदेहावर कोणीही शिलास्मारक बांधू नये. मृत्यूनंतर अनामिकाप्रमाणे जमिनीखाली राहण्याची माझी इच्छा आहे. या क्षणभंगूर जगातील हे आपलं क्षणभंगूर अस्तित्व असतं त्याचा फोटो तरी कशाला हवा?

close